हिंगणघाटच्या नर्सरीतील झाडे ब्राझीलला होणार रवाना

 नर्सरीमध्ये काम करताना दिगांबर खांडरे व त्यांची मुले शशांक व शुभांक.
नर्सरीमध्ये काम करताना दिगांबर खांडरे व त्यांची मुले शशांक व शुभांक.

हिंगणघाट, वर्धा : मनुष्यात जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे तीन गुण असल्यास यशाचे शिखर गाठणे सोपे होते. दिगांबर खांडरे व त्यांची दोन मुलं शशांक व शुभांक यांनी त्यांच्या प्रयत्नातून असेच शिखर गाठले आहे. त्यांनी सुरू केलेल्या रोपवाटिकेतून झाडे ब्राझील येथे जाणार आहे. विदेशात झाडे पाठविणारी जिल्ह्यातील ही पहिलीच रोपवाटिका ठरत आहे.  दिगांबर खांडरे यांनी १९९२ मध्ये दहा हजार फूट जागेवर स्नेहल किसान नर्सरीत रोपवाटिका सुरू केली. त्याच नर्सरीतील वडेलियाची पाच हजार तर बांबूची पाच लाख रोपे ब्राझीलमध्ये पाठवली जाणार आहे. ती रोपे टप्प्याटप्प्याने पाठवली जाणार आहे, दिगांबर खांडरे यांनी सुरू केलेली ही रोपवाटिका आता ५५ एकरमध्ये पसरली असून येथे वेगवेगळ्या प्रजातीची पाचशे ते सहाशे वेगवेगळ्या प्रजातीची एक ते १५ फूट पर्यंतची रोपे तयार केली जात आहे.  बांबूची आठ ते १० फुटांची रोपे आणि वडेलियाची रोपे ब्राझीलला हिंगणघाट ते मद्रास या मार्गे ट्रकने आणि मद्रास येथून जहाजाने एस.एस. इंटरनॅशनल (जयपूर) येथे संचालक निर्भय कटारिया यांच्यामार्फत विदेशात पाठवली जाणार आहे. सन २०१३ ला दिगांबर खांडरे यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या सोबत त्यांची दोन मुलं शशांक हा मार्केटिंग सांभाळतो तर शुभांक हा नर्सरी सांभाळतो. राज्यात हिंगणघाट येथून प्रथमच मोठ्या संख्येने रोपांची निर्यात करण्यात येत आहे. वडेलिया ही पहाडी भाग हिरवागार करण्याचे काम करणारी वनस्पती आहे.  जयपूर येथील एस.एस. इंटरनॅशनल कंपनीच्या मार्फत विदेशात ही रोपे पाठविण्याकरिता दोन वर्षांपासून त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या रोपांची लागवड ब्राझीलच्या रिसोर्टमध्ये केली जाणार आहे. वणा नदीच्या पुलाजवळ असलेल्या नर्सरीत दिगांबर खांडरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार समीर कुणावार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अशोक बोंगीरवार आदींची उपस्थिती होती. या वेळी त्यांना विदेशात रोपे पाठविण्याची माहिती देण्यात आली. ही बाब अभिनंदनीय असल्याचे उद्‌गार या वेळी पाहुण्यांनी काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com