मी वड बोलतोय... धोका ओळखा, वृक्षारोपण करा : सयाजी शिंदे

मी वड बोलतोय... धोका ओळखा, वृक्षारोपण करा : सयाजी शिंदे
मी वड बोलतोय... धोका ओळखा, वृक्षारोपण करा : सयाजी शिंदे

बीड : ‘मी वड बोलतोय...’ म्हणत आजच्या पर्यावरणाची माहिती सांगत भविष्याचे धोके ओळखा आणि वृक्षारोपणासह संगोपन करा. मी ही चळवळ गेल्या अनेक दिवसांपासून उभी केली आहे. जे माझ्यासोबत येतील त्यांच्यासोबत मी ही चळवळ पुढे नेणार आहे. तुम्हीही सोबत या, असे आवाहन सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. परिसरातील सह्याद्री-देवराई या वनप्रकल्प असलेल्या डोंगरावर आयोजित दोनदिवसीय वृक्षसंमेलनाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. १३) वडाच्या झाडाची मुलींच्या हस्ते पूजा करून झाले. अध्यक्षस्थानी वडाचे झाड असल्याने त्याचे मनोगत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. या वेळी सिनेअभिनेते आणि पटकथालेखक अरविंद जगताप, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, वन अधिकारी अमोल सातपुते, माजी आमदार उषा दराडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले की, माझा म्हणजेच वडाचा जन्म १८५७ चा असून, माझ्या आजोबाचा जन्म त्यापूर्वीचा आहे. वडाचे झाड हे सर्वांत जुने झाड असून, वनस्पतीमध्ये सर्वांत जास्त ऑक्सिजन देणारे वडाचे झाड आहे. जेव्हा जीव गुदमरतो तेव्हा ऑक्सिजनची किंमत कळते. वडाचे झाड हे सर्वांत श्रीमंत झाड असल्याचे सांगून सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचे धोके ओळखा, आपले गाव, शहर, राज्य आणि देश हिरवेगार करण्यासाठी झाडे लावा आणि ते जगवा, असे आवाहन केले. या चळवळीत कायम राहून जास्तीत जास्त जंगल कसे उभे राहतील, यासाठी प्रयत्न करू, असेही श्री. शिंदे म्हणाले. यानिमित्त बुधवारी शहरातून वृक्षदिंडी निघाली. दरम्यान, गुरुवारी संमेलनस्थळाचा डोंगर वृक्षप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. महिलांच्याही यानिमित्त वृक्षदिंड्या आल्या. संमेलनात ‘निसर्गाचे वैविध्य’ या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने झाली. तसेच, संमेलनानिमित्त आयोजित इंडियन - भारत निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. संमेलनानिमित्त पर्यावरण आणि वृक्षसंवर्धन व लागवड, यावर आधारित वृक्षसुंदरी स्पर्धेतील पहिली फेरीही संपन्न झाली. या ठिकाणी उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्यासाठी आणि वृक्षाबाबत शास्त्रशुद्ध माहिती असणाऱ्या स्टॉलवरही वृक्षप्रेमींनी गर्दी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com