पंधरा हजार एकरवर बांबू लागवड

जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु बांधावरील दुर्लक्षित असलेल्या बांबू शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून परिणामी राज्यात १५ हजार एकरांवर लागवड झाली आहे.
Planting bamboo on fifteen thousand acres
Planting bamboo on fifteen thousand acres

नगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु बांधावरील दुर्लक्षित असलेल्या बांबू शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून परिणामी राज्यात १५ हजार एकरांवर लागवड झाली आहे. 

बांबू लागवडीला गती येण्यासाठी राज्यात अटल बांबू योजना व राष्‍ट्रीय बांबू मिशन योजनेतून लागवड केली जाते. आतापर्यंत राज्यात ६ हजार हेक्टरवर लागवड झाली असून त्यात दोन वर्षात ९८४ शेतकऱ्यांनी ६५६ हेक्टरवर अटल बांबू योजनेतून तर ५ हजार १८५ लाभार्थ्यांनी ५ हजार ३८१ हेक्टरवर राष्ट्रीय बांबू मिशन योजनेतून लागवड केली आहे. यात प्रामुख्याने कोकण, नगर, लातूर, उस्मानाबाद, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्यात बांबूचे क्षेत्र वाढत आहे. राज्यात २०१९-२० मध्ये लक्ष्यांकानुसार एकूण ३ हजार ४८६ हेक्टरवर बांबू लागवड करण्यात आली होती. तर कोविडच्या महामारीमुळे २०२०-२१ मध्ये २ हजार ५५१ हेक्टरवर एकूण लागवडी झालेल्या आहेत.

नाशिक विभागात आतापर्यंत ४८१ शेतकऱ्यांनी ४७० हेक्टर बांबू लागवड केली आहे. विभागात गेल्यावर्षी २ लाख ६ हजार आठशे, तर यंदा १ लाख ७४ हजार बांबू रोपांची लागवड झाली आहे. बांबू लागवडीसोबत महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या माध्यमातून राष्‍ट्रीय बांबू अभियान अंतर्गत ‘कॅपिटल इन्व्हेसमेंट सबसिडी’ या योजनेतून बांबुवर आधारित खासगी बांबू उद्योग प्रकल्पासाठी अनुदान दिले जात आहे. नाशिक भागातील शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी अभ्यासदौरेही केले जात आहेत.

नगर जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग  नाशिक विभागात एकूण पाच बांबू प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. त्यातील नगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर या दुष्काळी तालुक्यात बांबू लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. कर्जत तालुक्यातील टाकळी खांडेश्वरी, जाफाबाद (ता. श्रीरामपूर) येथे अगरबत्ती तयार करण्यासह अन्य प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. पाच उद्योगासाठी एक कोटी दहा लाखाचा निधी असून त्यातील पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे. बांबुत सुबाभळीची लागवड हा राज्यातील पहिला प्रयोगही डॉ. दिलीप बागल यांनी कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे  केला आहे.

बांबुचा समुचित विकास करणे व तसेच बांबूच्या क्षमतेचा सामान्य, गरीब जनतेला आर्थिक व सामाजिक विकास करून देश विकासाला चालना देण्याचे काम सुरू आहे. जास्तीत  जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. - भास्करराव पवार, समन्वयक, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, नाशिक विभाग

दुष्काळी भागासाठी बांबू फार फायदेशीर आणि शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे. मी स्वतः आठ एकरवर लागवड केली आहे. मागणी चांगली असल्याने लागवड करणे गरजेचे आहे. जागतिक बांबू दिनानिमित्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी अशी माझी अपेक्षा आहे. डॉ. दिलीप बागल, बांबू उत्पादक शेतकरी, नांदगाव, कर्जत, जि. नगर

#plant bamboo हॅशटॅग मोहीम  विश्व बांबू संघटनेतर्फे चालुवर्षी #PlantBamboo असा नवीन हॅशटॅगची घोषणा करण्यात आली आहे. बांबू लागवड, महत्त्व व त्यासंबंधी उपक्रम व संधी यावर जनजागृती करण्यात येत आहे. बांबूसंबधी जनजागृती होण्यासाठी २००९ पासून दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिवस’ हा जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com