वेळणेश्वरात कातळावर आले लागवड

वेळणेश्वरात कातळावर आले लागवड
वेळणेश्वरात कातळावर आले लागवड

गुहागर  : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे गाडगीळ काकांनी अर्धा गुंठा कातळावर यंदा ४० किलो आल्याची यशस्वी लागवड केली आहे. गतवर्षी त्यांनी याच कातळावर शंभर किलो हळद लागवड करून दाखवली होती. वर्षभरातील पालापाचोळा पसरून त्यात शेणखत, गांडूळखत, जीवामृत आणि अमृतपाणी वापरून गाडगीळ कातळावर शेतीचे प्रयोग यशस्वी करत आहेत. शेखर गाडगीळ हे कॉलेज आॅफ इंजिनिअरींग, पुणे येथे विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा होती. म्हणून ते वेळणेश्वरला सातत्याने येऊ लागले. वेळणेश्वरमधील दोन वाड्यांमध्ये रेन हार्वेस्टिंगचे काम केले. याच दरम्यान त्यांनी कातळ जमीन खरेदी केली. तेथेही रेन हार्वेस्टिंगमधून १३ लाख लीटर पाण्याचा संचय ते करत आहेत. कोकणातील विहिरी मे महिन्यात आटतात. म्हणून दोन कप्प्यांची रचना विहिरीत करून त्यामध्ये पावसाचे पाणी साठविण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. गाडगीळ यांनी स्वखर्चाने काही ठिकाणी सौरदिवे दिले. गेली चार वर्षे कातळावर पालापाचोळा टाकून त्यात कृषी उत्पन्न मिळते का, असा प्रयोग ते करू लागले. पालापाचोळ्यात शेणखत, गांडूळ खत टाकले. जीवामृत, अमृतपाणी शिंपले. गेल्या वर्षी  २०० रोपे लावून अर्ध्या गुंठ्यात १०० किलो ओल्या हळदीचे व २५ किलो कंदाचे उत्पादन घेतले. यावर्षी आले लागवड केले. बाजारात उपलब्ध असलेले आले त्यांनी घेतले. १.५ किलो आल्यापासून रोपे तयार केली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कातळावरील पालापाचोळ्याच्या थरावर लागवड केली. गांडूळ खताचा वापर केला. नियमितपणे जिवामृतचा डोस दिला. यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पाणी द्यावे लागले नाही. मात्र डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाणी शिंपले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढणी केली असता ४० किलो आल्याचे उत्पादन झाले.  हळदीनंतर कातळावरील हा प्रयोगही सफल झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com