शेतकऱ्यांसाठीच्या 'निवृत्तीवेतन योजने'च्या नोंदणीस प्रारंभ

शेतकऱ्यांसाठीच्या 'निवृत्तीवेतन योजने'च्या नोंदणीस प्रारंभ
शेतकऱ्यांसाठीच्या 'निवृत्तीवेतन योजने'च्या नोंदणीस प्रारंभ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. या योजनेत २ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना ऐच्छीक व योगदानासहित सहभागी होता येणार आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर योजनेत सहभागी शेतकऱ्यांना प्रतिमहिना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. कृषिमंत्री म्हणाले, की शेतकरी हे काबाडकष्ट करतात तरीही त्यांना पुरेशे उत्पन्न मिळत नाही. समाजात सामाजिक न्याय महत्त्वाचा आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विधायक योजना सुरू केल्या आहेत.  ‘पीएम-केएमवाय’ योजना ही त्यापैकीच एक आहे. देशभरात ‘पीएम-केएमवाय’ योजनेसाठी शुक्रवारी (ता. ९) देशभारात नोंदणी सुरू झाली असून दुपारपर्यंत ४१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. ही योजना जम्मू आणि काश्मी‍र, लडाखसह संपूर्ण देशात लागू आहे.   मोफत नोंदणी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मत्र्यांना महत्त्वाच्या योजना पहिल्या शंभर दिवसांत राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. या योजनेत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ही योजना ऐच्छीक आणि योगदानासह राबविण्यात येणार आहे. १८ ते ४० वयोगटांतील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येईल. योजनेची नोंदणी समायिक सुविधा केंद्रांमध्ये (सीएससी) होणार आहे. ‘सीएससी’ प्रत्येक शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी ३० रुपये फी आकारणार आहे. मात्र हे शुल्क शासन भरणार असल्याने शेतकऱ्यांसाठी नोंदणी मोफत आहे, अशी माहिती कृषिमंत्री तोमर यांनी दिली.      

पती-पत्नीलाही सहभागी होता येणार या योजनेत शेतकरी पती-पत्नीलाही वेगवेगळी नोंदणी आणि हप्ते भरून सहभागी होत येणार आहे. दोघांनीही नोंदणी केल्यानंतर दोघांनाही तीन, तीन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल. निवृत्तीच्या तारखेच्या आतच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ही योजना सुरू ठेवता येईल. मृत शेतकऱ्याच्या पत्नीला ही योजना सुरू ठेवायची नसल्यास शेतकऱ्याने योजनेत भरलेली रक्कम व्याजासह पत्नीला देण्यात येईल. शेतकऱ्याची पत्नी ह्यात नसल्यास त्याच्या वारसाला ही रक्कम दिली जाईल. निवृत्तीनंतर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पत्नीला ५० टक्के निवृत्तीवेतन मिळेल.

पाच वर्षांनंतरही बाहेर पडता येणार शेतकऱ्यांना इच्छा असल्यास या योनजेतून किमान पाच वर्षांनंतर बाहेर पडता येईल. या वेळी शेतकऱ्यांना त्यांनी भेरलेली रक्कम बॅंक देत असलेल्या व्याजाप्रमाणे व्याज एलआयसी देणार आहे. जे शेतकरी पीएम-किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची इच्छा असल्यास पीएम-केएमवाय’ योजनेचा हप्ता थेट या लाभातून कापण्यात येईल. नियमित हप्ते भरण्यास शेतकरी असमर्थ ठरल्यास थकबाकी रक्कम आणि ठरलेले व्याज भरून शेतकरी पुन्हा या योजनेत नियमित सहभागी होऊ शकतात. 

५५ ते २०० रुपये हप्ता ‘पीएम-केएमवाय’ योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या वयोगटानुसार ५५ ते २०० रुपये प्रतिमहिना हप्ता भरावा लागणार आहे. हा हप्ता नोंदणी झालेल्या महिन्यापासून निवृत्ती होण्यापर्यंत भरावा लागणार आहे. शेतकरी भरत असलेल्या हप्त्याएवढाच निधी केंद्र सराकार निवृत्तीवेतन निधीमध्ये जमा करणार आहे, असेही तोमर यांनी सांगितले.  अशी आहे ‘पीएम-केएमवाय’ योजना   ऐच्छीक व योगदानासहित सहभागी होता येणार   २ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना लाभ   नोंदणी शुल्क सरकार भरणार, शेतकऱ्यांना मोफत नोंदणी   वयोगटानुसार ५५ ते २०० रुपये प्रतिमहिना हप्ता भरावा लागणार    शेतकऱ्याच्या हप्त्याएवढाच निधी केंद्र सराकार जमा करणार    पती-पत्नीलाही नोंदणी आणि हप्ते भरून सहभागी होत येणार   निवृत्तीच्या आतच मृत्यू झाल्यास पती किंवा पत्नीला योजना सुरू ठेवता येईल   योजना सुरू ठेवायची नसल्यास शेतकऱ्याने भरेलेली रक्कम व्याजासह पती किंवा पत्नीला देण्यात येईल   शेतकऱ्याचा पती किंवा पत्नी ह्यात नसल्यास वारसाला रक्कम मिळणार    निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास पती किंवा पत्नीला ५० टक्के निवृत्तीवेतन   शेतकऱ्यांना किमान पाच वर्षांनंतर योजनेतून बाहेर पडता येणार  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com