‘पोकरा’ प्रकल्पाने खर्च केले ७१३ कोटी 

राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे ७१३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सुमारे एक लाख ९३ हजारांवर लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
The Pokra project cost Rs 713 crore
The Pokra project cost Rs 713 crore

अकोला ः राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे ७१३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सुमारे एक लाख ९३ हजारांवर लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मार्च महिन्याची क्रमवारी प्रकल्पाने जाहीर केली असून, योजनांचा खर्च, कामकाजात मराठवाड्यातील तालुके अग्रेसर आहेत. 

राज्यात १८ मे २०१८ पासून विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील एकूण १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांत हा प्रकल्प सुरू आहे. हवामान बदलामुळे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना सक्षम करणे, शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी पाठबळ देण्याचा प्रमुख उद्देश आहे. 

या प्रकल्पाच्या कार्यकक्षेत असलेल्या १५ जिल्ह्यांतील सुमारे ७ लाख ४३८५५ शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर ३१ मार्चपर्यंत नोंदणी केली आहे. या अर्जांपैकी १९३३७० शेतकऱ्यांच्या खात्यावर ७५७ कोटी निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. पाण्याचा ताळेबंद तयार असलेल्या गावात मृद्‌ व जलसंधारणाची ६४० कामे पूर्ण झाली आहे. त्यासाठी १२.१२ कोटी रुपये देण्यात आले. याच प्रकल्पातून काढणीपश्‍चात व्यवस्थापन व मूल्य साखळीचे बळकटीकरण या घटाअंतर्गत १३९ शेतकरी गट, बचत गट व उत्पादक कंपन्यांच्या भाडेतत्त्वावर अवजार बँक, शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्था, बियाणे प्रक्रिया व बियाणे साठवणूक, शेती उत्पादनांचे संकलन, वर्गीकरण व प्रतवारी, तेलघाणी, पशुखाद्य निर्मिती, हळद प्रक्रिया इत्यादी सारख्या कृषी उद्योगांकरिता १४.८५ कोटींचे अनुदानही देण्यात आले. 

आता तालुकानिहाय कामांचा निर्देशांक  प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड, वैयक्तिक शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे अस्तरीकरण, विहीर पुनर्भरण, पंप संच इत्यादी घटकांना पूर्वसंमती देण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रकल्प अंमलबजावणीची प्रगती अवलंबून आहे. त्यामुळे सदर आढावा घेण्यासाठी १५५ तालुका कृषी अधिकारी यांच्या कामाची प्रगती मोजमापासाठी दरमहा परफॉर्मन्स निर्देशांक तयार केला जाणार आहे. यामध्ये सध्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या परफॉर्मन्स निर्देशांकात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका अव्वल ठरलेला आहे. याच जिल्ह्यातील पाच तालुके पहिल्या सहामध्ये आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हा तालुका सर्वांत शेवटच्या म्हणजे १५५ व्या स्थानावर आहे. तर अकोला जिल्ह्यातील एकही तालुका पहिल्या ५० मध्येही आलेला नाही. यावरून अकोला जिल्ह्यात प्रकल्पाच्या कामांची स्थिती दिसून येते. 

मेहकरचा आनंद क्षणिक  पोकरा प्रकल्पाकडून आधी जाहीर केलेल्या निर्देशांक क्रमवारी यादीत बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका पहिल्या क्रमांकावर दाखविण्यात आला होता. समाज माध्यमातून कृषी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ही कामगिरी फिरवली. शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला होता. मात्र ही क्रमवारी चुकून तयार झाली होती. त्यानंतर सुधारित क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात मेहकर तब्बल १३५ व्या स्थानावर मागे गेल्याचे दिसून येते. तर पहिल्या स्थानी वैजापूर आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com