पोलिस मुख्यालयच बनले शेतकरी आंदोलनाचे केंद्र !!

पोलिस मुख्यालयच बनले शेतकरी आंदोलनाचे केंद्र !!
पोलिस मुख्यालयच बनले शेतकरी आंदोलनाचे केंद्र !!

अकोला : पोलिस मुख्यालय सध्या आंदोलन केंद्र बनले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांबाबत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन सुरु आहे. सोमवारी मोर्चा व ठिय्या आंदोलन झाल्यानंतर आंदोलकांनी संपूर्ण रात्र पोलिस मुख्यालयात घातली होती. आज मात्र आंदोलकांनी येथेच ठिय्या मांडल्याने, सरकारसह सर्वांचीच धावपळ उडाली आहे. 

दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. शरद पवार, राजू शेट्टी, उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी वरुन श्री. सिन्हा यांच्याशी संपर्क साधला. तर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी भेट देउन आंदोलनाला पाठिंबा दिला.

नाफेडकडून संपूर्ण शेतमालाची खरेदी केली जावी या एका मागणीवर अकोल्यात सोमवारी (ता. तीन) सुरु झालेले यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांचे आंदोलन अद्यापही कायम आहे. सिन्हा, तुपकर यांनी सोमवारची रात्र पोलिस मुख्यालयात घालवली. जिल्हा प्रशासनाकडून आंदोलन सोडविण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र तोडगा निघाला नाही. सायंकाळी पोलिसांनी सिन्हा, तुपकर व इतरांना स्थानबद्ध केले. रात्री हे आंदोलन सुटेल असे वाटत असताना जसजशी रात्र पुढे सरकत होती, तसे आंदोलक संतप्न होत गेले. रात्री साडेदहाच्या सुमारास रविकांत तुपकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. 

मुख्यमंत्र्यांनी सहा मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. परंतु नाफेड खरेदी हा केंद्राचा विषय असून त्यातील अटी हा धोरणात्मक भाग आहे. त्यामुळे त्यावर केंद्र शासनच पावले ऊचलू शकते असे सांगितले. यशवंत सिन्हा यांना नाफेडच्या मुद्यावरच तोडगा हवा होता. तो मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चचेर्र्तून न सुटल्याने रात्र पोलिस मुख्यालयात घालविण्यात आली.     आंदोलकांनी केलेल्या मागण्यांपैकी काही सोडविण्याबाबत आश्‍वासन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने बोंडअळी संदर्भात जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांनी म्हटले की, जिल्ह्यात कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व्हेचे काम पूर्ण झाले. जे शेतकरी अद्यापही सर्वेतून सुटले असतील त्यांचाही समावेश करण्यात येईल. कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करून पाठपुरावा करण्यात येईल.

मूग-उडीद-सोयाबीन व इतर धान्य खरेदीसंदर्भात नाफेडच्या अटी काढण्याबाबत केलेली मागणी ही शासन स्तरावरील असून याबाबत पत्र पाठवून अवगत करण्यात आले आहे.  शेतमालाची ठरवून दिलेल्या हमीभावानेच खरेदी व्हावी यासाठी जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासन निकषाप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कर्जमुक्तीच्या प्रश्‍नावर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले की, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यक्षेत्रात अकोला व वाशीम जिल्हा येतो. जिल्हा बॅंकेला प्राप्त 62749 शेतकऱ्यांच्या ग्रीन यादीपैकी 55414 शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर 239 कोटी 26 लाख रुपये कर्जमाफी पोटी जमा करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीज जोडणी न तोडण्याबाबत महावितरण कंपनी अधीक्षकांना कळविले जाईल तसेच सोने ताण माफीच्या जाचक अटीप्रश्‍नी जिल्हा स्तरावरून शासनाने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही जिल्हाधिकारी पांडेय यांनी कळविले आहे. 

शेतकरी आंदोलनाला वाढता पाठींबा  अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको भारीप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेना ही उतरली रस्त्यावर आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी खासदार तथा सिनेमा कलाकार शत्रुघ्न सिन्हा पोहचण्याची शक्यता आहे.

आमदार बच्चू कडू आजपासून आन्दोलनात उतरणार शेतकरी प्रश्नांसाठी भाजप नेते यशवन्त सिन्हा यांनी अकोला येथील पोलीस ठाण्यात काल पासून ठिय्या आंदोलन सुरू केले.,हे आंदोलन योग्य दिशेने उचललेले पाऊल असून आज सायंकाळ पासून आपणही यशवन्त सिन्हा यांना आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचे आ. बच्चू कडू यांनी अमरावती येथे सांगितले.

शेतकऱ्यांना हवी विना अट नाफेडची खरेदी जागर मंचाने केलेल्या बहुतांश मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक असल्याचे सांगितले. परंतु आंदोलकांना नाफेडने उत्पादनाची कुठलीही अट न ठेवता खरेदी करावी ही मागणी रेटून धरली आहे. त्यामुळे आंदोलन चिघळत गेले. याबाबत ठोस आश्‍वासनाशिवाय मागे न हटण्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com