बारडगाव दगडी येथील शेतकरी कुटुंबाचा पोलिसांकडून बांधावर गौरव

नगर ः कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील शशिकांत चव्हाण हे पारधी समाजातील शेतकरी. कष्टातून स्वतः खरेदी केलेल्या शेतात त्यांनी द्राक्ष बाग फुलविली आहे.
Police honors farmer family at Bardgaon Dagdi on farm
Police honors farmer family at Bardgaon Dagdi on farm

नगर ः कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील शशिकांत चव्हाण हे पारधी समाजातील शेतकरी. कष्टातून स्वतः खरेदी केलेल्या शेतात त्यांनी द्राक्ष बाग फुलविली आहे. अशा परिवर्तनवादी शेतकऱ्यांची इतरांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगत कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुरुवारी (ता.२४) चव्हाण कुटुंबाचा थेट त्यांच्या शेतात जाऊन गौरव केला. एखाद्या शेतकरी कुटुंबाचा थेट बांधावर जाऊन पोलिसांनी गौरव केल्याचे कौतुक होत आहे.

शशिकांत चव्हाण यांनी येथील भाऊसाहेब वाकळे यांच्याकडून २५ वर्षांपूर्वी एक एकर शेती विकत घेतली. तीही केवळ ५ हजार ३०० रुपयांत. पण चव्हाण यांच्याकडे पैसे नसल्याने वाकळे काही दिवस पैशाला थांबले. नंतर चव्हाण यांनी बाजारातून छोटे बोकड विकत आणले. ते मोठे करून विकले. त्यातून आलेले पैसे, तसेच वेळोवेळी जमेल तसे पैसे वाकळे यांना दिले. त्यासाठी तब्बल १२ वर्षे लागली. 

नगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात पारधी समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यात अनेकांकडे गुन्हेगार म्हणून पाहिले जाते. चव्हाण यांनी गुन्हेगारीकडे वळण्याऐवजी शेती कसण्याचा निर्धार केला. त्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वकष्टाने माळरानावरील शेती खरेदी केली. सध्या त्यांच्याकडे एक एकरावर द्राक्ष बाग आहे. याच जमिनीतील उत्पन्नातून त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. पोलिस हवालदार तुळशीदास सातपुते, मनोज लातूरकर, ग्रामीण विकास केंद्राचे संविधान प्रचारक तुकाराम पवार, भाऊसाहेब वाकळे, गणेश कदम आदी उपस्थित होते. पोलिसांच्या सन्मानाने त्या शशिकांत यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांत गुन्हेगारीत पारधी समाजातील तरुणांची संख्या अधिक दिसते. पारधी व इतर समाजातील गुन्हेगारांनी गुन्हे न करता सन्मानाने जगण्यासाठी शेती अथवा अन्य रोजगाराकडे वळावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. शशिकांत चव्हाण त्यासाठी आदर्श आहेत. - चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com