महाराष्ट्रात राजकीय भूकंप, फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

Political earthquake in Maharashtra, Devendra Fadnavis Chief Minister, Ajit Pawar Deputy Chief Minister
Political earthquake in Maharashtra, Devendra Fadnavis Chief Minister, Ajit Pawar Deputy Chief Minister

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारच्या (ता. २२) रात्रीत मोठा राजकीय भूकंप झाला. संपूर्ण महाराष्ट्र साखरझोपेत असताना रातोरात राज्यातून राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करीत भाजपसोबत सत्तास्थापन केली. इतकेच काय तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्राला तसूभरही कल्पना न देता राजभवनात हा छोटेखानी शपथविधी आटोपण्यात आला. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून अजित पवार यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार करणार नाही, असे सांगणाऱ्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेली फोडाफोडी पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच तूर्तास सुटला असला तरी नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

गेले महिनाभर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व सहमती झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची शनिवारी पुन्हा बैठक होणार होती. मात्र त्याआधीच महाराष्ट्राला गोंधळात टाकणारी सकाळ उजाडली आणि राजकीय भूकंप पाहायला मिळाला. 

राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर पाठोपाठ अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना येत्या ३० तारखेपर्यंत म्हणजेच आठ दिवसांची मुदत सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता येताच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांचे आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले. 

आमच्याकडे १७० आमदारांचे संख्याबळ ः महाजन

भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे ५४ आणि आमचे १०५ भाजपचे आमदार आहेत. याव्यतिरिक्त अनेक अपक्ष आमदारदेखील आमच्यासोबत आहेत. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १७० च्या पुढे जाईल. आम्ही महाराष्ट्राला पुढील ५ वर्षे स्थिर सरकार देऊ. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विधिमंडळाचे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. याचाच अर्थ संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासोबत आहे, असेही श्री. महाजन यांनी स्पष्ट केले. 

आम्ही स्थिर सरकार देऊ ः देवेंद्र फडणवीस

मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींना याबाबत माहिती देऊन आम्हाला शपथविधीसाठी बोलावले. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

स्थिर सरकारच्या दृष्टीनेच निर्णय घेतला ः अजित पवार

निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला आला. तेव्हापासून कोणीही सरकार स्थापन करू शकले नाही. महाराष्ट्रात इतके वेगवेगळे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार स्थापन होणे महत्त्वाचे होते. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आणि आज सरकार स्थापन केले.

बैठकीतील चर्चा संपतच नव्हती. मागील एक महिन्यापासून ही चर्चा सुरू होती. कुठल्याही प्रकारचा मार्ग निघत नव्हता. नको त्या गोष्टींच्या मागण्या वाढल्या होत्या. त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र येऊन असे प्रश्न तयार होत असतील, तर पुढे स्थिर सरकार कसे मिळणार असा मला प्रश्न पडला. राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकारच्या दृष्टीनेच मी हा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

सत्तानाट्य कसे घडले?

अजित पवार यांच्या गोटातून शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सकाळी भेटण्याचा निरोप देण्यात आला. त्यानुसार हे आमदार सकाळी सात वाजता मंत्रालयासमोरील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर एका ठिकाणी चर्चेला जायचे आहे असे सांगून त्यांना राजभवनावर नेण्यात आले. राज्यपालांपुढे या दहा आमदारांना उभे करून अजित पवार यांनी पक्षाच्या ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना सादर केले असावे, अशी शक्यता आहे.

शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने सर्व आमदारांच्या सह्या असलेले पत्र शुक्रवारीच तयार केले होते. मात्र, वस्तुस्थिती लक्षात येताच राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार शपथविधीनंतर शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आणि आम्ही पक्षासोबत आहोत, असा निर्वाळा दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com