पॉलिहाउस- शेडनेटधारकांचे आज राज्यभर धरणे आंदोलन

पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पॉलिहाउस,शेडनेटमध्ये उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला हमीभावाचे संरक्षण मिळावे, पीकविमा योजनेत नाशवंत शेतीमालाचा समावेश करावा, शासकीय योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना विनाविलंब अनुदान साह्य मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. - डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः कर्जमाफीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी गेली तीन वर्षे सुरू असलेल्या लढ्याची शासन पातळीवरून अद्याप दखल घेतली जात नाही. त्यामुळे येत्या सोमवारी (ता. ९) राज्यभरातील पॉलिहाउस- शेडनेटधारक शेतकरी त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पॉलिहाउस- शेडनेटधारक शेतकरी समन्वय समितीतर्फे देण्यात आली आहे.

दुष्काळ, नापिकी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला मिळणारा अल्प भाव यांसारख्या कारणांमुळे गेल्या पाच-सहा वर्षांत राज्यातील पॉलिहाउस-शेडनेटची शेती तोट्यात गेली आहे. तसेच पॉलिहाउस-शेडनेट शेती योजनांच्या अंमलबजावणीतल्या चुकीच्या शासन धोरणांचा या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नोकरीच्या मागे न लागता आधुनिकतेची कास धरत अनेक उच्चशिक्षित तरुण पॉलिहाउस-शेडनेट शेतीकडे वळाले.

मात्र वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या तोट्याच्या शेतीतून डोक्यावरील बँक कर्जाचा डोंगर वाढला असून, परिणामी त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. आधुनिक शेती करून आपण मोठी चूक केली अशी त्यांची एकंदरीत भावना झाली असल्याचे समितीने म्हटले आहे.  कृषिमंत्री व राज्यमंत्र्यांनी अडचणीत सापडलेल्या पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. प्रत्येक वेळी आश्वासनांवरच बोळवण केली गेल्याने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांनी घेतला आहे, असे समितीचे सोलापूरचे समन्वयक संजय तळेकर यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com