कर्जमाफीसाठी पॉलिहाउस, शेडनेटधारकांचे राज्यभर धरणे
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस, शेडनेटधारकांचे राज्यभर धरणे

कर्जमाफीसाठी पॉलिहाउस, शेडनेटधारकांचे राज्यभर धरणे

पुणे ः संपूर्ण कर्जमाफीसाठी पॉलिहाउस आणि शेडनेटधारक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ९) पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन सोलापूर, नगर, जळगाव, उस्मानाबाद येथे करण्यात आले. 

सोलापूर येथे दिवसभर जिल्हाधिकारी कार्यलयांसमोर मागण्या लिहिलेल्या विशिष्ट टोप्या घालून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मागण्यांबाबत सकारात्मक विचार न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. 

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे आंदोलन झाले. पॉलिहाउस-शेडनेट शेती योजनांच्या अंमलबजावणीतल्या चुकीच्या शासन धोरणांचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण पॉलिहाउस-शेडनेट शेतीकडे वळाले. मात्र, दुष्काळ आणि घसरलेले बाजारभाव अशा वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या शेतकऱ्यांचा बॅंक कर्जाचा डोंगर वाढला आहे.

अनेक बॅंका आता १३८ कलमासारखी गंभीर कलमे लावून शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीसाही पाठवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. विशेष म्हणजे दुष्काळात या सर्व नोटीसांना, वसुलींना स्थगिती असताना सरकार बॅंकांवर कारवाई करत नाही. त्यासाठी तातडीने ही वसुली थांबवावी आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

विदर्भातील पॉलिहाउस,  शेडनेटधारकांनी गाठले मंत्रालय नागपूर ः शेडनेट, पॉलिहाउसधारकांचे कर्जमाफी संदर्भात राज्यभर आंदोलन झाले. विदर्भातील शेडनेट, पॉलिहाउसधारकांनी मात्र थेट आंदोलन न करता मंत्रालय गाठत कृषिमंत्र्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडले. शेडनेट, पॉलिहाउससाठी घेतलेले कर्ज माफ करावे आणि तसा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. विदर्भातील सुमारे ३०० शेडनेट, पॉलिहाउसधारकांचे कर्ज थकीत असून त्यातील १०२ शेतकरी एकट्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. उशिरापर्यंत या संदर्भाने कोणताच निर्णय झाला नव्हता, अशी माहिती वर्धा जिल्हा पॉलिहाउस व शेडनेट पीकउत्पादक संघटनेच्या सदस्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com