`डाळिंब बागा वाळू लागल्यात पंचनामे करायला कुणी बी फिरकंना`

वसंत कोडग, मधुकर कोडग, चिंतामणी कोडग, रंगराव कोडग अशी चौघांची डाळिंबाची शेती आहे. परंतु पाण्याची कमतरता असल्याने बागा वाळून गेल्या आहेत. आमच्या बागांचे पंचनामे होऊन आम्हाला नुकसानभरपाई मिळावी. - रंगराव कोडग, औंढी, ता. जत.
पाण्याअभावी डाळिंब बागा वाळून जात आहेत
पाण्याअभावी डाळिंब बागा वाळून जात आहेत

सांगली ः ‘‘दोन वर्षांपासनं टॅंकरनं पाणी देऊन बाग जगवली. माझ्याकडे चार एकर डाळिंबाची बाग आहे. शेतात पाच बोअर व एक विहीर आहे. शेताच्या पायथ्याशी साखळी सिमेंट बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नाही. पाणी नसल्यानं बागा वाळू लागल्या आहेत. पंचनामे करायला कुणी बी फिरकलं नाय. मी कुणाकडं दाद मागायची,’’ अशी व्यथा उटगी (ता. जत) येथील डाळिंब उत्पादक लायप्पा सनोळी मांडत होते.

जिल्ह्यात सरासरी १५ हजार एकरांवर डाळिंबाचे क्षेत्र असून त्यापैकी सुमारे पन्नास टक्के म्हणजे ७५०० एकरांवरील डाळिंबाच्या बागा जळून गेल्या आहेत. जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यात प्रामुख्याने डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गेल्या वर्षी पावसाची कमतरता आणि यंदा पावसाने दिलेली हुलकावणी असा दुहेरी फटका डाळिंब शेतीला बसला आहे.

परंतु गेल्या दोन वर्षांपासून या दुष्काळीपट्ट्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने डाळिंबाच्या बागा वाळून गेल्या आहेत. वास्तविक पाहता गेल्या वर्षात जळालेल्या बागांचे पंचनामे होतील, या आशेने डाळिंबाच्या बागा तशाच होत्या. परंतु कृषी विभागाने या बागांचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. टॅंकरने पाणी दिले तरी डाळिंबाचे अपेक्षित उत्पादन मिळणे मुश्कील आहे. त्यामुळे बागेसाठी खर्च करण्यास शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. दुष्काळी भागात सातत्याने पाणीटंचाई मुळे डाळिंब उत्पादक मेटाकुटीला आला आहे. वाळलेल्या बागांचे पंचनामे करावी अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. परंतू संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com