निफाड, सिन्नर भागांत पाणीटंचाईचा डाळिंब बागांना फटका

निफाड, सिन्नर भागांत पाणीटंचाईचा डाळिंब बागांना फटका

नाशिक  : निफाड, सिन्नर तालुक्यांच्या सीमालगत भागातील तळवाडे, महाजनपूर, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव पाटपिंप्री, सुळेवाडी, केपानगर या गावांमध्ये भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणीटंचाईमुळे काही डाळिंब बागा सुकून गेल्या आहेत, तर जनावरांचा चारा शेतातच करपला आहे. 

मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम हातातून गेले. अशातच काही भागांत पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. ओढे, नाले, तलाव वर्षापासून कोरडे पडले आहेत. यामुळे जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे; मात्र काही ठिकाणी फक्त पिण्यापुरते पाणी उपलब्ध आहे. एप्रिल महिन्यात तर विहिरींनी पूर्णपणे तळ गाठला आहे. डाळिंबाच्या बागा जळत असून, जनावरांसाठी शेतात उभा असणारा चारादेखील सुकून गेल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अनेक गावांमध्ये कूपनलिका बंद झाल्याने पाण्यासाठी टँकरची आवश्यकता असूनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचा टँकर गावात येत नसल्याने पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी स्थितीमुळे मेंढ्यांना पिण्यासाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या रानात मेंढ्या बसवल्या जातात तिथेच त्यांचे त्या दिवसासाठी घर बनते. मात्र सध्या पिण्यासाठी पाणी नसल्याने शेतात कुठेही राहता येत नाही. मेंढ्यांचे कळप पाण्यासाठी दिवसभर परिसरात भटकंती करताना दिसत आहे. 

दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम  दरम्यान, यंदा दुष्काळी स्थितीमुळे निफाड तालुक्यात हिरवा चारा मिळणेदेखील दुरापास्त होऊ लागल्याने त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे परिसरात हिरवा चारा उपलब्ध नाही. त्यातच वाढत्या मागणीमुळे सरकी, ढेप यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. खर्च वाढत असूनही दुधाचा दर तोच असल्याने दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. खर्च आणि उत्पादन यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी दुभती जनावरे विक्री करण्याचा निर्णय घेत आहेत; मात्र सगळीकडे सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांचे दर कमी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com