आढळा लाभक्षेत्रातील डाळिंबबागा अडचणीत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लिंगदेव, जि. नगर  : दुष्काळाच्या झळा एक-दोन वर्षांआड नेहमीच सोसत असलेल्या अकोले तालुक्‍यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात या वर्षीही तीव्र दुष्काळ आहे. पाण्याअभावी येथील डाळिंबाच्या बागा जळून गेल्या असून, चाऱ्याचे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे परिणामी दुग्धव्‍यवसायही अडचणीत सापडला आहे. 

अकोले तालुक्‍यातील देवठाण, वीरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी, डोंगरगाव, हिवरगाव आदी भागांत शेतीसह माणसांची व जनावरांची तहान भागविणाऱ्या आढळा धरणाने तळ गाठला आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने धरणात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आवर्तनही कमी सोडण्यात आले. सध्या ऐन उष्णतेच्या लाटेत धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे गत दोन महिने पाणी उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंबबागा अक्षरशः जळून गेल्या आहेत. काही ठिकाणी हाता-तोंडाशी आलेली फळे झाडावरच जळून गेली आहेत. काही ठिकाणी विहिरीच्या थोड्या-फार पाण्यावर जगविलेली झाडांची फळे कमी पाणी मिळाल्याने फुटून खराब झाली आहेत. यावर्षी पाणीटंचाई लक्षात घेता, आढळा भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदालागवड करणेही टाळले.

या भागात शेतीपूरक असलेल्या दुधाचे प्रमाणही या वर्षी चाऱ्याअभावी कमी झाले आहे. ओला चारा तर नाहीच; सुका चाराही उपलब्ध नसल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. केवळ शेती आणि दुग्धव्यवसायावर कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून असलेले शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याअभावी हवालदिल झाले आहेत. या भागातील छोटी धरणे, तलाव कोरडे असल्याने हतबल झालेले शेतकरी पावसाची आतापासूनच वाट पाहू लागले आहेत.  आढळा धरणावर अकोले तालुक्‍यासह संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यांतील सिन्नर तालुक्‍यातील काही गावांचे शेतीक्षेत्र अवलंबून आहे. ''विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार'' या म्हणीप्रमाणे या भागातील बऱ्याच विहिरींनीही तळ गाठल्याने विहिरीवर शेती जगविण्याची अशाही संपली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com