सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा गंडवले
सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका व्यापाऱ्याचे डाळिंब ठरवलेल्या ठिकाणी न पोचवता ट्रकचालकाने परस्पर विकल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जवळपास २४ हजार किलो डाळिंब परस्पर विकून सुमारे २२ लाख तीन हजार रुपये किमतीचा अपहार केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाळिंब व्यापाऱ्यांची ट्रकचालकांनी फसवणूक केल्याची जानेवारी महिन्यातील तिसरी घटना असून, यामुळे शेतकरी, व्यापारी धास्तावले आहेत.
मेजर मुलकसिंग (रा. स्पेरहरी, जि. पटियाला, पंजाब), रामपाल (रा. रताखेडा, जि. फतेहबाद, हरियाना) ट्रकचालक हरप्रीत सिंग (रा. चंदरकल्याण थाना, जि. फतेहबाद, हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, शशिकांत विठ्ठल येलपले (रा. यमगर मंगेवाडी, ता. सांगोला) हे डाळिंबाचा व्यापार करतात.
१५ जानेवारीला शशिकांत येलपले यांनी त्यांच्या ज्ञानराज कृषी ट्रान्सपोर्ट सांगोला येथून ट्रकमधून (पीबी १३ बीए २६६६) २० लाख ६० हजार रुपये किमतीचे २४ हजार ०८१ किलो डाळिंब वाहनात भरून त्रिपुरा येथील कोयलासर येथे मुलकसिंग, रामपाल, हरप्रीत सिंग यांना विक्रीसाठी पाठवले होते. डिझेलसाठी एक लाख ४३ हजार रुपये दिले होते.
परंतु, संशयितांनी ट्रकमध्ये भरलेले डाळिंब कोयलासर येथे न पोचविता त्यांची परस्पर विक्री केली. त्यानंतर त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने अखेरीस येलपले यांनी पोलिसात फिर्याद दिली.
महिन्यातील तिसरी घटना
सांगोला तालुक्यात जानेवारी महिन्यातील अशा पद्धतीची तिसरी घटना आहे. या प्रकाराने डाळिंब व्यापारी, शेतकऱ्यांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये भीती बसली आहे. त्यामुळे डाळिंब निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.