रमजानमुळे डाळिंबाला मागणी वाढली 

उत्तर भारतातून रमजानमुळे महाराष्ट्राच्या डाळिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळे भावपातळी पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.
pomegranate
pomegranate

पुणे: उत्तर भारतातून रमजानमुळे महाराष्ट्राच्या डाळिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळे भावपातळी पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.  नाशिकच्या डाळिंब बाजारात सध्या चांगल्या मालाला १३०० ते १५०० रुपये प्रतिक्रेट दर मिळतो आहे. नाशिकसह श्रीगोंदा, नारायणगाव, सटाणा, संगमनेर, नगर भागातून व्यापाऱ्यांना माल मिळतो आहे. पंढरपूर, सांगोला भागातून आवक कमी झाली आहे. मालेगाव भागातील काही गावांमध्ये चांगले माल असले तरी कोरोनाची साथ सुरू असल्यामुळे शेतकरी थेट लिलावाला माल आणण्याऐवजी शिवार सौद्यांना प्राधान्य देत आहेत.  डाळिंब व्यापारी इश्वरदास गुप्ता म्हणाले की, ‘‘कोरोनाच्या आधी नाशिक भागात डाळिंबाला १७०० ते १८०० रुपये प्रतिक्रेट भाव मिळत होता. आवक देखील ३००० ते ५००० क्रेट्सची होती. मात्र, कोरोनामुळे व्यापारी साखळी तुटली. डाळिंबाचे बाजार दोन आठवडे बंद ठेवावे लागले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. व्यापाऱ्यांच्या घरापर्यंत शेतकऱ्यांचे सतत फोन सुरू झाल्यामुळे आम्हीच पुढाकार घेत डाळिंबाचे सौदे पुन्हा सुरू केले. वाहतुकीची मोठी समस्या असून देखील शेतकऱ्यांचे माल विकत घेण्यास सुरूवात केली गेली.’’  नाशिक जिल्ह्यातील डाळिबांचे सौदे आता पुन्हा सुरू झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून चांगल्या मालासाठी व्यापारी १४०० ते १६०० रुपये प्रतिक्रेट भाव देत आहेत. बिहारलाईनसाठी ८०० ते ११०० रुपये तर उत्तरप्रदेश लाईनसाठी ५०० ते ७०० प्रतिक्रेट रुपये दराचा माल खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांकडून २० किलोच्या क्रेटमधून घेतलेला हा माल व्यापाऱ्यांकडून निवडून पुढे दहा किलोच्या पेटीतून किंवा १५ किलोच्या ड्रममधून उत्तर भारताकडे पाठविला जातो.  सांगोला येथील डाळिंब उत्पादक अमित शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर,सांगोला,इंदापूरचे डाळिंब लिलाव बंद आहेत. व्यापाऱ्यांकडून सांगोला भागात शिवार सौदे सुरू असून माल कमी आहेत. भाव ३० ते ३५ रुपये दिला जातो. सध्या नागपूर व हैद्राबाद लाईनकडे माल पाठविला जात आहे.  मालाची कमतरता  ४० रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले डाळिंब पुढे आडत, वाहतूक, पॅकिंग खर्च मिळवून ६५ रुपये किलोने सध्या विकले जात आहे. रमजानमुळे मागणी वाढली असून माल कमी आहेत. मात्र, १५ जूननंतर पुन्हा संगमनेर भागातून नवे माल सुरू होतील. डाळिंबाला पुढे भावपातळी १४०० ते १५०० रुपये राहू शकते, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com