डाळिंब निर्यातीतून जीवनात लाली

अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मक. मात्र प्रयोगशीलता व सचोटीने दुष्काळी आटपाडी तालुक्यातील विजय मरगळे या शेतकऱ्याने दिमाखदार भरारी घेतली आहे.
Pomegranate exports are a lifeline
Pomegranate exports are a lifeline

सांगली ः अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मक. मात्र प्रयोगशीलता व सचोटीने दुष्काळी आटपाडी तालुक्यातील विजय मरगळे या शेतकऱ्याने दिमाखदार भरारी घेतली आहे. स्वतःपासून सुरू झालेला डाळिंब निर्यातीचा हा प्रवास ५०० शेतकऱ्यांच्या जीवनात डाळिंबासारखी लाल चुटूक गोडी वाढवत आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी कल्पकतेने आटपाडीसह कवठेमहांकाळ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि माळशिरस या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या दर्जेदार डाळिंबाला मरगळे यांच्या ‘आयडिया’ने सातासमुद्रापार नेले आहे. शेतकऱ्यांकडून एक पै न घेता विना मोबदला मार्गदर्शन करून मरगळे यांनी डाळिंब उत्पादकांना परकीय चलन मिळवून दिले आहे.

आटपाडी तालुका म्हटलं, की दुष्काळी, अवर्षणप्रवण भाग असा डोळ्यासमोर येतो. याच तालुक्यातील इथला शेतकरी कष्टाळू आणि जिद्दी आहेत. संकटे येतात म्हणून मागे न हटता त्यावर मात करण्याची अफाट इच्छाशक्ती इथल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे दिसते आहे. रणरणत्या उन्हात, फोंड्या माळ रानावर लाल चुटूकदार डाळिंबाची लागवड केली. डाळिंबातून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसा येऊ लागला. हा शाश्‍वत पैसा असल्याने शेतकरी डाळिंबाकडे वळाले. हळूहळू तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र वाढले. पुढे आटपाडी दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा तालुका अशी ओळख निर्माण झाली.

यात तालुक्यातील तडवळे हे भीषण दुष्काळाशी सामना करणारे गाव. या गावातील विजय मरगळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत बीएससी ॲग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांचा पारंपरिक डाळिंब शेतीचा व्यवसाय हाती घेतला. डाळिंबातून जेमतेम उत्पन्न निघत होते. मात्र, उत्पादकतेत वाढ होण्यास अडचणी होत्या. शिक्षणानंतर नोकरीचा विचार करण्यापेक्षा आहे त्या, डाळिंब पिकाचा शास्त्रोक्त अभ्यास सुरू केला. लहानपणापासूनच मातीशी संबंध होताच, मात्र कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला वेगळी दृष्टी पात्र झाली. जमिनीचा पोत, वातावरण, हवामान, खते, डाळिंबाचे वाण, एकूण अर्थकारणाचा सांगोपांग अभ्यास सुरू झाला. त्यातून कमी खर्चात दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री सुरू झाली. मात्र डाळिंबाचे अर्थकारण हे स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता त्यांच्या मनात निर्यातक्षम उत्पादनाचा विचार घोळू लागला.

...असा झाला श्रीगणेशा २०११ मध्ये विजय यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. स्थानिक बाजारपेठेत विक्री बरोबरच युरोप बाजारपेठेत निर्यातीसाठी प्रयत्न सुरू झाले. त्याची सर्वांगीण माहिती घेण्याचे काम धडाक्यात सुरू झाले. निर्यातीचे निकष, मालाची गुणवत्ता, आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील नियम व अटींची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत निर्यात करायचीच या जिद्दीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. सातत्याने निर्यातीचे गणिते डोक्यात सुरू झाली. विजय आणि त्यांचा मित्र जितेंद्र गिड्डे या दोघांनी सर्वप्रथम डाळिंबाची निर्यात केली. मुळात, डाळिंब निर्यात करण्यास खर्च अधिक येतो, अशी मानसिकता शेतकऱ्यांमध्ये होती. ती दूर करण्यासाठी प्रबोधन करण्याचे अवघड व आव्हानात्मक काम सुरू झाले. अभ्यासूवृत्तीला चिकाटी, व जिद्दची जोड दिल्याने हे काम हळूहळू विस्तारत गेले.

खरं तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीच्या संकटाची शुक्लकाष्ठ संपण्यास तयार नाही. त्यात कोरोना माहामारीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे गणित पूर्ण बिघडले आहे. अशा आव्हानात्मक काळातही शेतकऱ्यांच्या साथीने पिकविलेल्या डाळिंबाला अपेक्षित दर मिळवून देणे ही कसोटी होती. मात्र विनामोबदला मार्गदर्शन करून पिचलेल्या शेतकऱ्याला आर्थिकदृष्‍ट्या पतवान बनविण्याची किमया निर्यातीने साध्य झाली आहे. भविष्यात सांगली जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाळिंबाबत वेगळ्या अर्थाने ओळख निर्माण होईल, असे नियोजन आहे. - विजय मरगळे, डाळिंब निर्यातदार

निर्यातीसह राखला दर्जा

  • ५०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन
  • २०० ते २५० शेतकरी करतात युरोपला डाळिंबाची निर्यात
  • दरवर्षी ६०० ते ७०० टनाची निर्यात
  • गतवर्षी १०० ते १५० टन युरोपला निर्यात
  • बांगलादेश, मलेशिया, रशिया या देशातही डाळिंब जाते
  • डाळिंब उत्पादकांचा वाटाड्या सातासमुद्रापार डाळिंब नेण्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देईना. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगली जिल्ह्यातील डाळिंबाची प्रमाण अत्यल्प होते. शेतकऱ्‍यांना निर्यातीसाठी प्रवृत्त केल्यानंतर दराचा यक्ष प्रश्‍न, पैशाची हमी, मालाची गुणवत्ता या गोष्टीही तितक्याच शंकास्पद होत्या. स्थानिक बाजारपेठेची सवय असलेल्या शेतकऱ्याचा माल सातासमुद्रापार नेणे हीच मुळात अशक्यप्राय गोष्ट होती. सुरुवातीला अवघ्या १५ शेतकऱ्यांना दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे धडे देण्यास सुरुवात झाली. त्यातून निर्यातीतील बारकावे, अंशविरहित डाळिंबाचे उत्पादन कसे घ्यायचे या तांत्रिक बाबी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्यात मरगळे यांना संकोच वाटत नाही. पंधरा शेतकऱ्यांपासून सुरू झालेला दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा प्रवास आज पाचशे शेतकऱ्यांना विना मोबदला दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी धडे देत आहेत. बाजारपेठेपेक्षा अपेक्षित दर मिळत असल्याने दर्जेदार डाळिंब उत्पादक घेण्यात झालेला माहीर शेतकऱ्यांनी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढे आले. विजय मरगळे  ९९६०५२८६०८  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com