agriculture news in marathi, pomegranate farming in Kadvanchi, Jalna | Agrowon

कडवंची : डाळिंबात तयार केली ओळख
अमित गद्रे
रविवार, 21 एप्रिल 2019

कडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर रावसाहेब क्षीरसागर यांनी मात्र डाळिंबाची बाग केली. गुणवत्तापूर्ण डाळिंबामध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली. फळबागेला त्यांनी गीर-गोपालनाची जोड दिली आहे. 

कडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर रावसाहेब क्षीरसागर यांनी मात्र डाळिंबाची बाग केली. गुणवत्तापूर्ण डाळिंबामध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली. फळबागेला त्यांनी गीर-गोपालनाची जोड दिली आहे. 

‘‘मित्रमंडळी मला चेष्टेने म्हणतात, की गाव द्राक्ष लावतेय, पैसा कमावतंय आणि तू मात्र डाळिंबाच्या मागं. बदल जरा... पण, मी लक्ष देत नाही. कारण विश्वास आहे, की एक दिवस हेच डाळिंब मला पुढे नेईल. डाळिंबात समाधानी आहे. हे झाड काटक आहे, योग्य नियोजनातून चांगल्या फळांचे उत्पादन घेत असल्याने मला अपेक्षित नफा मिळतोच’’....हे बोल आहेत ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचे.

कडवंची शिवारात ज्ञानेश्वर आणि सदाशिव क्षीरसागर या बंधूंची ५२ एकर शेती. त्यापैकी दहा एकर डाळिंब शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली. बाकीच्या क्षेत्रात हंगाम निहाय पिकांची लागवड असते. दहा एकर क्षेत्रात भगवा जातीची तीन टप्प्यांत लागवड आहे. संपूर्ण गाव द्राक्ष शेतीकडे वळले असताना डाळिंब लागवडीवरच का भर दिला? असं विचारलं असता, ज्ञानेश्वर डाळिंब बागेचा प्रवास सांगू लागले... हे सगळं माळरान होतं. हलकी जमीन, विहिरीला जेमतेम पाणी. हाती पैसा कमी. फळबागेचा विचार करताना करमाड (जि. औरंगाबाद) येथील मित्र, तसेच धार कल्याण येथील माझे सासरे काशीनाथ उगले यांच्याकडील डाळिंब बाग पाहिली. त्यांच्याकडून व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती घेतली आणि २०११ मध्ये दोन एकर, २०१४ मध्ये सहा एकर आणि २०१५ मध्ये दोन एकरावर डाळिंब लागवड केली. डाळिंब बाग करायच्या अगोदर संरक्षित पाण्यासाठी २०१० मध्ये एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. त्यामुळे लागवडीनंतर फळबागेला पाण्याचा ताण बसला नाही. फळबाग वाढवायची असल्याने २०१२ मध्ये पुन्हा ४५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. 

झाडाला देतो मोजूनच पाणी
पाणी नियोजनाबाबत ज्ञानेश्वर क्षीरसागर म्हणाले, की माझ्या शेतीला नैसर्गिक उतार असल्याने  बांधबंदिस्ती केली. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात मुरते, अति झालेले पाणी सांडव्यातून शेताच्या उतारला जाते. उताराच्या टोकाला मी दोन शेततळी घेतली. या दोन शेततळ्यांमध्ये मोठी चारी घेतली. या चारीत पहिल्या पावसापासून जमा होणारे पाणी साठते. हे साठलेले पाणी पंपाने उचलून शेततळी भरून घेतो. याचबरोबरीने विहिरीतही साठलेले पाणी शेततळ्यात भरतो. साधारणपणे डिसेंबर शेवटपर्यंत विहिरीचे पाणी पुरते. जानेवारी ते २० मेपर्यंत शेततळ्यातील पाणी मोजून वापरतो. माझ्या बागेत प्रत्येक झाडाला आठ लिटर क्षमतेचे दोन ड्रिपर आहेत. फळवाढीच्या टप्प्यात एक आड एक दिवस प्रतिझाड ३२ लिटर पाणी. उष्णता वाढली, तर दररोज पाणी देतो. सेटिंगपर्यंत पाणी मर्यादित देतो. त्यानंतर फळवाढीच्या २.५ ते ३ महिन्यांच्या काळात रोज प्रतिझाड ४० लिटर पाणी देतो. गरजेनुसारच पाणी दिले जाते. कारण मला जूनपर्यंत दहा एकरांसाठी एक कोटी ४५ लाख लिटर पाणी पुरवायचे असते. तसेच जनावरांच्यासाठी पाणी ठेवावे लागते. गेल्या दोन वर्षांत पाऊस कमी झाल्याने  बागेत दहा ट्रॉली पाचटाचे आच्छादन केले. त्यासाठी पस्तीस हजारांचा खर्च आला. त्याचबरोबरीने दहा टन बगॅसदेखील आच्छादनासाठी वापरले. त्याचा वीस हजारांचा खर्च झाला. हे सेंद्रिय आच्छादन जमिनीत कुजते. त्याचा सेंद्रिय कर्ब वाढ, ओलावा टिकण्यास मदत होते. जमीनदेखील भुसभुशीत राहते. साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटी फळांचा हंगाम संपतो. त्यानंतर केवळ झाडे जगण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा दोन तास ठिबक सिंचनातून पाणीपुरवठा करतो. त्याचबरोबरीने ०ः०ः५० देतो. दोन एकरांतील बागेत मृग बहर आणि आठ एकर बागेत हस्त बहर धरतो. 

बागेचे नियोजन

  •   गेल्या सहा वर्षांपासून हस्त बहराचे व्यवस्थापन. प्रत्येक झाडाला मातीची भर.  भरपूर प्रमाणात शेणखताचा वापर. पाचट, बगॅस आच्छादन.
  •   सेंद्रिय खते, निंबोळी पेंड आणि विद्राव्य खतांचा शिफारशीत वापर. दर १५ दिवसांनी प्रतिझाड दोन लिटर जीवामृताची आळवणी.
  •   एकात्मिक पद्धतीने कीड, रोग व्यवस्थापनावर भर. मर्यादित फवारण्या.
  •   बागेच्या स्वच्छेतवर भर. सशक्त झाड, योग्य छाटणी करून कॅनोपी मोकळी, त्यामुळे तेलकट डाग, मर रोगाचा प्रादुर्भाव नाही. योग्य वाफसा ठेवतो. झाडाच्या गरजेनुसारच पाणी.
  •   शेणखत, जीवामृताच्या वापराने जमिनीची सुपिकता जपली, ओलावा टिकून राहतो. 
  •   मोठ्या झाडावर सरासरी १५०, तर लहान झाडावर ८० फळे ठेवतो. तीन गटांत फळांची प्रतवारी करून नाशिक बाजारपेठेत विक्री. सरासरी प्रतिकिलोस ४० ते ७५ रुपये दर.
  •   एकरी साडेआठ टनांचे उत्पादन. खर्च वजा जाता एकरी दीड लाखाचा नफा.
  •   यंदाच्या वर्षीपासून मृग बहराचे नियोजन. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाच्या दृष्टीने प्रयत्न.

तीन एकरांवर द्राक्षबागेची उभारणी
ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी यंदा तीन एकरांवर द्राक्ष खुंटांची लागवड केली. या बागेत इनलाइन ठिबक करून लॅटरलच्या दोन्ही बाजूला कोथिंबिरीची टोकण केली. या कोथिंबिरीच्या तीन कापण्या घेता येत असल्याने खर्च वजा जाता वीस हजारांचा नफा मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

शेतकरी गटातून प्रगती
 ज्ञानेश्वर क्षीरसागर हे करमाड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, तसेच कडवंची गावातील स्वामी विवेकानंद शेतकरी स्वयंसहायता बचत गटाचे सदस्य आहेत. गटाच्या उपक्रमाबाबत ते म्हणाले, की आमचा गट सहा वर्षांपूर्वी सुरू झाला. गटात मी आणि सदाशिव क्षीरसागर असे दोघे डाळिंब उत्पादक आहोत. बाकीचे चौदा द्राक्ष उत्पादक आहेत. गटातील बचतीतून २ टक्के व्याजदराने गटातील सदस्यांना कर्ज देतो. हा पैसा शेती कामासाठी वापरतो. दर महिन्याचा पहिल्या रविवारी एकत्र जमून चर्चा करतो. गटचर्चा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर घेतो. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना आणि पुढील पीक नियोजनाबाबत चर्चा करतो. आम्ही  पुणे, सोलापूर जिल्ह्यातील प्रयोगशील द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांना भेटी देऊन त्यांचे तंत्रज्ञान समजाऊन घेतो. गटाचा व्हॉट्‍सॲप ग्रुप आहे.

पशुपालनाची जोड 
गेल्या चार वर्षांपासून ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी मुक्तसंचार पद्धतीने गोपालन सुरू केले. याबाबत ते म्हणाले, की मुख्य उद्देश म्हणजे शेणखत आणि जीवामृतासाठी शेण, गोमूत्राची उपलब्धता. गीर आणि लाल कंधारी गाईंचे संगोपन करण्याचे कारण म्हणजे या गाई काटक आहेत. त्या फारशा आजारी पडत नाहीत. उपलब्ध चाऱ्यावर गुजराण होते. दूधही चांगले आहे. मी गोठ्यातच चांगली वंशावळ तयार करतो. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी दोन गुंठे नेपिअर गवताची लागवड आहे. ज्वारीचा कडबा असतो. सध्या माझ्याकडे चार गीर, तीन लालकंधारी, एक गीर वळू आणि दोन वासरे आहेत. गीर गाय दररोज १० लिटर, तर लालकंधारी ४ लिटर दूध देते. दहा एकर डाळिंब बागेसाठी मी एका वेळी सिमेंट टाकी, तसेच प्लॅस्टिक बॅरेलमध्ये तीन हजार लिटर जीवामृत तयार करतो. सात दिवस चांगले मुरवतो. दर पंधरा दिवसांनी प्रतिझाड दोन लिटर जीवामृताची आळवणी करतो. 

संपर्क : ज्ञानेश्वर क्षीरसागर : ९७६४६९८३६४

इतर यशोगाथा
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...
कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...
भूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...
गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...
सिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले...हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील...
प्रतिकूलतेवर मात करीत बटण मशरूमचा...स्पर्धा परीक्षेतून हुलकावणी, त्यानंतर केळी...
विदर्भात यशस्वी खजूरशेती, दहा...नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा...
दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम...सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर...
संकटातही ऐंशीहजार लेअर पक्षी उत्पादनाची...अमरावती जिल्ह्यात खरवाडी येथे सुमारे ३० ते ३५...
प्रयत्नवाद, सातत्यातून शोधला दुष्काळात...शिक्षणानंतर शेतीची कास धरली, पण दुष्काळानं परवड...
फळबाग शेतीसह बारमाही भाजीपाला पिकांचा...धुळे जिल्ह्यातील चौगाव (ता. धुळे) येथील युवा...
संशोधक शेतकऱ्याने बनविला जीवामृत फिल्टर...नाशिक जिल्ह्यातील पिंपरी सय्यद येथील प्रयोगशील...