सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकून

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे डाळिंबाचे दर या सप्ताहातही पुन्हा तेजीत राहिले.
Pomegranate prices rise in Solapur
Pomegranate prices rise in Solapur

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे डाळिंबाचे दर या सप्ताहातही पुन्हा तेजीत राहिले. प्रतिक्विंटलला सर्वाधिक १२ हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

गेल्या काही महिन्यांपासून डाळिंबाला उठाव मिळतो आहे. मूळात डाळिंबाची आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने ही परिस्थिती असल्याचे सांगण्यात येते. डाळिंबाची सर्वाधिक आवक सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ या स्थानिक भागातून झाली. बाहेरील जिल्ह्यातील आवक तुलनेने खूपच कमी राहिली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी ३२०० रुपये आणि सर्वाधिक १२ हजार रुपये इतका दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यात केवळ २०० ते ५०० रुपयांचा किरकोळ चढ-उतार वगळता दर तेजीत राहिले. 

फळभाज्यामध्ये हिरवी मिरची, वांगी, भेंडी यांना चांगला उठाव मिळाला. त्यांचे दर मात्र काहीसे स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची आवक रोज २० ते ५० क्विंटल, वांग्याची १५ ते २० क्विंटल आणि भेंडीची ५ ते १० क्विंटल अशी आवक राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, वांग्यांना किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये, तर भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. 

भाज्यांच्या दरात या सप्ताहातही तेजी होती. भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्या रोज आवक राहिली. मेथीला शंभर पेंढ्यासाठी ६०० ते ८०० रुपये, कोथिंबिरीला ५०० ते ७०० रुपये आणि शेपूला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. 

कांदा लिलाव विस्कळित, दर स्थिर

भाजीपाला आणि फळांचे लिलाव या सप्ताहात बऱ्यापैकी होत राहिले. पण कडक लॅाकडाऊनमुळे कांद्याच्या लिलावात विस्कळितपणा राहिला. संपूर्ण आठवड्यातून दोन-तीन दिवसच लिलाव होऊ शकले. पण त्यासाठीही खरेदीदार आणि व्यापारी फारसे नसल्याने लिलावात अडथळे आले. त्यामुळे कांद्याचे दर काहीसे स्थिरच राहिले. कांद्याची आवक रोज ५० ते ८० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com