डाळिंबावरील प्रक्रिया, निर्यातीचा टक्का वाढेना

डाळिंबावरील प्रक्रिया, निर्यातीचा टक्का वाढेना
डाळिंबावरील प्रक्रिया, निर्यातीचा टक्का वाढेना

सोलापूर : सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंब उत्पादनासह गुणवत्तेवर झालेला परिणाम, डाळिंब संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठांच्या त्याच त्या शिफारशी आणि प्रक्रिया उद्योगासाठी संधी असूनही सरकार पातळीवर असलेली अनास्था, यांसारख्या समस्यांमुळे जगभरातील एकूण डाळिंब उत्पादनात भारताचा वाटा 50 टक्‍क्‍यांपर्यंत असूनही डाळिंबाच्या प्रक्रिया उद्योगाचा टक्का अवघ्या 3 आणि निर्याताचा टक्का 5 टक्‍क्‍यांच्या पुढे काही केल्या सरकत नसल्याचे चित्र आहे.

देशभरात सुमारे दीड लाख हेक्‍टरपर्यंत डाळिंब क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक सव्वालाख हेक्‍टरपर्यंतचे क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, राज्यस्थान, गुजरात या राज्याचा क्रमांक लागतो. कोरडवाहू शेतीचे अर्थकारण बदलणाऱ्या डाळिंबाबाबत शासन अद्यापही गंभीर नसल्याचेच या सगळ्या परिस्थितीवरून दिसून येते. डाळिंबावरील तेल्या आणि मरसारख्या रोगांनी यापूर्वी सातत्याने शेतकऱ्यांना हैराण केले. शिवाय दुष्काळ, गारपीट आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे त्यात आणखीनच भर टाकली.

नैसर्गिक आपत्तीचे असे अनेक अडथळे पार करत डाळिंब उत्पादकांनी त्यावर हिमतीने मात केली. पण डाळिंब उत्पादकांच्या समस्या संपण्याऐवजी त्यात वरचेवर भरच पडत गेली. साहजिकच, अलीकडच्या काही वर्षांत डाळिंबाची गुणवत्ता घसरण्यासह निर्यातीत सातत्य राखणे कठीण झाले आहे. त्याशिवाय निर्यातीसाठी आवश्‍यक असलेल्या सोयीसुविधा, सवलती या सरकार पातळीवरील धोरणाचा फटकाही निर्यातीला बसतो आहे. अशा अस्मानी आणि सुलतानी दुहेरी चक्रात डाळिंब उत्पादक अडकला आहे.

निर्यात अवघी पाच टक्के स्पेन, इराण, अफगाणिस्तान, इजिप्त, पाकिस्तान आणि अमेरिका हे देश डाळिंब उत्पादनातील भारताचे प्रमुख स्पर्धक आहेत. दरवर्षी जगभरात सुमारे दहा लाख मेट्रिक टन डाळिंबाचे उत्पादन होते. त्यापैकी पाच लाख मेट्रिक टनांहून अधिक उत्पादन एकट्या भारतात होते. त्यानुसार डाळिंबाच्या एकूण उत्पादनातील जवळपास 50 टक्के वाटा भारताचा असूनही युरोप आणि आखाती देशांतील काही मोजके देश वगळता अन्य देशांत भारतीय डाळिंब अद्यापही पोचू शकलेले नाही. शिवाय निर्यातीचा टक्का अवघा 5 टक्के इतका आहे.

ठोस धोरणांचा अभाव भारतीय डाळिंबाची एकरी उत्पादकता ही अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे. वाढती उत्पादकता आणि बाजारपेठेतील मंदी, यामुळे देशातंर्गत बाजारात डाळिंबाचे दर सातत्याने घसरतात. दर एक-दोन वर्षांनी ही स्थिती उद्‌भवते, यंदाच्या वर्षी ही परिस्थिती पुन्हा उदभवली आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाचे दर प्रतिकिलोला अवघ्या 20 ते 40 रुपयांवर खाली आले, आता त्यात काहीशी सुधारणा होते आहे. या परिस्थितीत प्रक्रिया उद्योगात मोठी संधी मिळू शकते; पण त्यासाठी हवे असणारे तांत्रिक वा आर्थिक साह्य मिळण्यात अजूनही शेतकऱ्यांना चाचपाडावे लागते. सरकारच्या धोरणाचा अभाव, याला कारणीभूत आहे. साहजिकच, एकूण उत्पादनापैकी अवघ्या 3 टक्के फळावर प्रक्रिया होते, यामध्ये शेतकरी, शेतकरी गट वा शेतकरी कंपन्यांना मोठी संधी मिळू शकते.

प्रकल्पांचे काम कागदावरही नाही गेल्या वर्षी सोलापुरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवादात राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी डाळिंबावरील प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. राज्यात वेगवेगळ्या भागांत दहा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आश्‍वासन दिले. तसेच संशोधन केंद्राच्या आवारातच तातडीने प्रक्रिया उद्योग उभारण्याचे जाहीर केले. पण यापैकी एकाही प्रकल्पाचे काम अजूनही साध्या कागदावर नाही.

सोलापूर लाल, अनारदाना नवीन वाण तब्बल बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने गेल्या वर्षी "सोलापूर लाल' आणि "सोलापूर अनारदाना' हे नवीन वाण विकसित केले. सध्या या रोपांचे वाटप सुरू आहे, ही काहीशी जमेची बाजू असली, तरी त्याची उत्पादनक्षमता आणि गुणवत्ता अजून ठरायची आहे. पण आता उत्पादन आणि उत्पादकता हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा राहिलेला नाही, त्यापेक्षा निर्यात आणि प्रक्रिया यावर अधिक भर देण्याची गरज आहे.   डाळिंब संघाचे पुण्यात आज वार्षिक अधिवेशन अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे वार्षिक अधिवेशन आणि राष्ट्रीय परिसंवादाचे आज (शनिवारी) पुण्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. बाजार समितीतील निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर असतील. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जैन इरिगेशन सिस्टिमचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटनाच्या सत्रानंतर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस डाळिंब उत्पादकांसाठी विविध विषयांवर तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, त्याशिवाय डाळिंब उत्पादनात उत्कृष्ट काम करणारे शेतकरी, शास्त्रज्ञ यांचा डाळिंबरत्न पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com