चुकीच्या आकडेवारीमुळे डाळिंब विमाधारक वंचित

महसूल आणि स्कायमेटच्या नोंदीत मोठी तफावत आहे. स्कायमेटच्या अधिकाऱ्यांनी आटपाडीत येऊन शासकीय आकडेवारीची नोंद घ्यावी अन्यथा सहा जानेवारीपासून धरणे आंदोलन करणार आहोत. - आनंदराव पाटील
चुकीच्या आकडेवारीमुळे डाळिंब विमाधारक वंचित
चुकीच्या आकडेवारीमुळे डाळिंब विमाधारक वंचित

आटपाडी, जि. सांगली ः तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यासाठी पावसाची चुकीची आकडेवारी दाखवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दहा हजार डाळिंब विमाधारक १०० कोटी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार आहेत. या गंभीर प्रकाराविरोधात ६ जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा श्रमिक मुक्ती दल आणि बळिराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.  आटपाडी तालुक्‍याने यावर्षी पावसाचा प्रदीघ खंड आणि अतिवृष्टी याचा अनुभव शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच घेतला. जून-जुलै महिन्यात सलग ३० दिवसांवर पावसात खंड पडला होता, तर ऑक्‍टोबर महिन्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली. महसूलकडे ऑक्‍टोबर महिन्यात ३४७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. मात्र स्कायमेट कंपनीने फक्त १७१ मिलिमीटर पाऊस दाखवला आहे. त्यामुळे शेतकरी विमा निकषात बसले नाहीत.  आटपाडी तालुक्‍यातील ९६६६ शेतकऱ्यांनी ४००० हेक्‍टर क्षेत्राचा हेक्‍टरी सहा हजार दोनशे रुपये प्रमाणे विमा रक्कम भरली होती. हेक्‍टरी एक लाख २१ हजार विमा संरक्षण दिले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसात खंड पडल्यास नुकसान भरपाई शेतकरी पात्र राहतात. प्रत्यक्षात पावसात खंड होता तशी महसूलकडे नोंद आहे पण स्कायमेटने कमी पाऊस दाखवला आहे. याशिवाय एकाच वेळी ४५ मिलिमीटर पाऊस पडला तर शेतकरी भरपाईसाठी पात्र होतात. ऑक्‍टोबर महिन्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली पण या दिवशी स्कायमेटने पाऊसच दाखवला नाही.  ऑक्‍टोबर महिन्यात स्कायमेटने १७६ मिलिमीटर दाखवला आहे. या चुकीच्या नोंदीमुळे विम्याचा लाभ मिळणार नाही. विमा कंपनीने पावसाच्या नोंदीची दुरुस्ती करून घ्यावी अशी, मागणी आहे. याबाबत श्रमिकचे आनंदराव पाटील आणि बळीराजा शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सहा जानेवारी पर्यंत पावसाच्या आकडेवारी दुरुस्ती करावी अन्यथा तहसील समोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com