डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवर

माझी दोन एकर डाळिंब बाग आहे. या महिन्यात काढणीस येत आहे; पण डाळिंब आकाराने बारीक-मोठे आहे. शिवाय ‘तेल्या’मुळे गुणवत्ता बिघडली आहे. आताच दर पडलेत, आता आम्हाला तेवढा तरी मिळतो की नाही, काय माहीत. खर्च निघाला तरी बस्स. सलग दुसऱ्या वर्षी ही परिस्थिती आली आहे. - दादासो पवार, सलगर बु., ता. मंगळवेढा, जि.सोलापूर
डाळींब
डाळींब

सोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये डाळिंबाचे दर गेल्या काही दिवसात गडगडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रतिकिलोचा दर २० ते २२ रुपयांवर आला आहे. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हैराण झाले असताना, आता या नव्या समस्येची भर पडली आहे. या हंगामात डाळिंबाची बाजारातील आवक साधारणपणे सुमारे पाच लाख टनांपर्यंत असते, पण यंदा ती सुमारे सात लाख टनांहून अधिक असल्याने ही परिस्थिती उद्‌भवल्याचे सांगण्यात येते.  नैसर्गिक आपत्तीचा मारा सातत्याने सहन करुनही डाळिंब उत्पादक मोठ्या तयारीने हंगामाला तोंड देतो, पण सलग दुसऱ्यावर्षी पुन्हा डाळिंब उत्पादक परिस्थितीपुढे हतबल झाला आहे, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, बीड, जालना या डाळिंब पट्ट्यात त्यामुळे अस्वस्थता आहे. गेल्या दोन वर्षात डाळिंबाचे क्षेत्रही वाढले आहे. राज्याचे सव्वालाख हेक्‍टरचे क्षेत्र आज पावणेदोन लाख हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. साहजिकच, यंदा उत्पादन वाढले आहे. आंबे बहाराच्या या हंगामात साधारणपणे पाच लाख टनापर्यंत डाळिंबाची आवक होत असते, पण यंदा ही आवक सात लाख टनावर पोचली आहे; पण गुणवत्ता मिळू शकलेली नाही, वातावरणातील सततच्या बदलामुळे तेलकट डागरोगाने पाय पसरले आहेत. परिणामी, बागांचे व्यवस्थापन कोलमडले आहे.  अनेक बागांमध्ये डाळिंबाला अपेक्षित आकार मिळालेला नाही, रंगही काळवंडून गेला आहे. त्याचा परिणाम थेट दरावर होतो आहे. प्रतिकिलोचा दर सरासरी किमान २० ते २२ रुपयांवर खाली आला आहे.  डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर, पुणे, इंदापूर, सांगली या प्रमुख बाजारपेठात डाळिंबाची रोज आवक वाढते आहे; पण मागणी घटल्याने दर पडले आहेत. गेल्याच आठवड्यात पुण्यात तब्बल तीस हजार क्रेटची आवक झाल्याचे सांगण्यात आले. एकाचदिवशी एवढा माल आल्याने बाजारात डाळिंब ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशीच परिस्थिती थोड्या-फार फरकाने सोलापूर, सांगली, पंढरपूर, इंदापूर या बाजारातही आहे.  बांगलादेशचा अडथळा याच हंगामात डाळिंबाला बांगलादेशचे मार्केट चांगल्या पद्धतीने मिळू शकते; पण बांगलादेशने आयातशुल्क प्रतिकिलो ५५ रुपयांवर नेऊन ठेवल्याने बांगलादेशातील निर्यातही थांबली आहे. तिथे मिळणारा दर आणि आयातशुल्काचा हिशेब घातल्यास त्याचा मेळ बसू शकत नाही. त्यामुळे हाही एक अडथळा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.  निर्यात जेमतेम राज्यांतर्गत स्थानिक बाजारात डाळिंबाच्या दराची अशी घसरण सुरू असताना, निर्यातीतही डाळिंबाची पिछाडी सुरू आहे. आंबे बहरातील डाळिंबासाठी या हंगामात युरोपमध्ये फारसा वाव नसताे; पण दुबईतील मार्केट चांगले चालते; पण यंदा या दोन-तीन महिन्यांत डाळिंबाची जेमतेम दहा हजार टनांपर्यंत निर्यात होऊ शकली आहे.  प्रतिक्रिया नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट डाळिंब उत्पादकांना भेडसावत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला तोंड देण्याची वेळ आली आहे. परिणामी, डाळिंबाची गुणवत्ता घसरत आहे.  -प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com