मिरज पूर्व भागात 'म्हैसाळ'च्या पाण्याने बंधारे, तलाव तुडुंब

म्हैसाळ योजनेच्या पाण्याने बंधारे भरले आहेत.
म्हैसाळ योजनेच्या पाण्याने बंधारे भरले आहेत.

मिरज, जि. सांगली   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाईने होरपळ होत असली तरी 'म्हैसाळ' च्या पाण्याने अनेक ठिकाणी दिलासा मिळाला. विशेषतः मिरज पूर्व भागातील बंधारे, ओढे भरून वाहत आहेत. उन्हाच्या तडाख्यात होरपळ होत असताना भरून वाहणारे कालवे दिलासा देत आहेत. 

दोन एप्रिलला उपसा सुरू झाल्यापासून पाण्याने जत ओलांडून मंगळवेढ्याची हद्द गाठली. चांदोली धरणातून तब्बल २६० किलोमीटरचा प्रवास केला. यादरम्यान अनेक बंधारे, ओढे, नाले भरून दिलेत. जलयुक्त शिवारसह योजनांतून बांधलेले बंधारे मे महिन्यात दुथडी भरून वाहत आहेत. विहिरी व कूपनलिकांचा जलस्तरही वाढला. अनेक गावांचे उन्हाळ्यातील जलसंकट टळले.

अपवाद वगळता बहुतांश गावांच्या स्वतःच्या पाणीयोजना आहेत. विहिरी, पाझर तलाव किंवा बंधाऱ्यांतून पाणीपुरवठा होतो. हे स्रोत भरल्याचे दिसते आहे. मल्लेवाडीत रामनगरमध्ये पोलिसांनी गणेश मंडळाच्या सहकार्यातून बांधलेला सुखकर्ता बंधारा दुथडी भरून वाहत आहे. मालगावात सावंत वस्तीवरचा बंधाराही 'हाउसफुल्ल' आहे. आरगच्या पाझर तलावातही पाणीसाठा झाला.    उर्वरित तलावही भरणार  जिल्हाधिकाऱ्यांनी ६१ पाणीस्रोत भरून घेण्याचे आदेश म्हैसाळ योजनेच्या प्रशासनाला दिलेत. उर्वरित तलाव, नालेही लवकरच भरून घेतले जातील. त्यामुळे उन्हाळा शेती व पिण्याच्या पाण्याबाबतीत सुसह्य ठरेल. आजमितीस मिरज तालुक्‍यात एकाही गावात टॅंकर सुरू नाही. तालुक्‍यातील पहिल्या क्रमांकाच्या मोठ्या भोसे तलावातही पाणी सोडले. दुसऱ्या क्रमांकाचा मोठा लिंगनूर तलाव मुबलक साठ्याने खळाळत आहे. सलगरे, खटाव, लक्ष्मीवाडी येथील पाझर तलाव, बंधारेही भरले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com