पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज नाही: पोपटराव पवार

शेतकऱ्यांचा मित्र, कृषी विद्यापीठांचा वाटाड्या आणि शासनाचा जागल्या अशा तीन मोठ्या भूमिका अतिशय जबाबदारीने ‘अॅग्रोवन’ पेलतो आहे. जगातील एकमेव कृषी दैनिकाचा हा उपक्रम चालेल की नाही अशी शंका सुरुवातीला उपस्थित केली गेली. पण, आज ‘अॅग्रोवन’ राज्यभर पसरला आणि ज्ञानाचा जागर बनला. - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
agrowon exhibition
agrowon exhibition

औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात पुन्हा डोक्यावर कर्ज येणार आहे. यामुळे शेतकरी पंगू होत आहेत. जगाचा पोशिंदा आज मरतो आहे. शेतकऱ्याला वीज, पाणी, बाजारपेठा आणि तंत्रज्ञान आदी पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज पडणार नाही, असे मत राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त के ले. 'सकाळ अॅग्रोवन'ने औरंगाबादच्या जबिंदा मैदानावर आयोजित केलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण;  तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘विक्रम टी’चे व्यवस्थापकीय संचालक भावेश पटेल, ‘पारस ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक प्रणेश बोथरा व रौनक बोथरा, ‘एमव्हीएस अॅक्मे’चे कार्यकारी संचालक श्री हर्षा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे उपस्थित होते. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस अॅक्मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्निकल फायबर्स आणि महाउर्जा सहप्रायोजक आहेत. ;अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ... श्री. पवार म्हणाले, “शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याचे नुसते बोलले जाते. पण, त्यालाच वेळेवर अन्न नाही. तो कर्जबाजारी असून त्याच्या मुलांची लग्नं होत नाहीत. त्याला वाचवण्यासाठी बाजारात चार पैसे मिळवून देणारी व्यवस्था आता उभारावी लागेल. सरकारने शेतीच्या मशागतीची कामे मनरेगाशी जोडायला हवीत. शेतकऱ्यांनाही यापुढे शेती सामुदायिक पद्धतीनेच करावी लागेल. प्रत्येक गावाला यापुढे शेतीसाठी पिके, पाणी, मार्केटिंगचे नियोजन करूनच वाटचाल करावी लागेल.” “जगाला धान्य पुरविण्याची क्षमता भविष्यात भारतात असेल. पण येथील शेतकरी आणखी कुपोषित आणि लोक आणखी मानसिक विकलांग होतील की काय अशी भीती मला वाटते, असे सांगत पवार म्हणाले की, “लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलत आहेत. कसदार अन्नाची जागा जादा कॅलरिजच्या अन्नाने घेतली आहे. मुले मैदानाऐवजी रिमोट आणि मोबाईलमध्ये अडकली आहेत. दुसऱ्या बाजूला रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीमधील मातीचेही आरोग्य बिघडले आहे. यापुढे पाण्याचा ताळेबंद आणि भूजल पुनर्भरण केल्याशिवाय शेतीला भवितव्य नसेल,” ‘अॅग्रोवन’च्या देदीप्यमान वाटचालीचा गौरवास्पद उल्लेख करताना श्री. पवार म्हणाले की, “गावशिवारापासून ते जगाच्या बाजारापर्यंत अॅग्रोवनने केवळ शेतीच नव्हे तर ग्रामसुधारणा आणि पंचायत राजसाठी मोठे योगदान दिलेले आहे. अॅग्रोवनच्या पहिल्या दिवसाच्या प्रकाशनापासून मी या परिवारात असून सरळ, सोप्या भाषेत अॅग्रोवन माहिती देतो आहे.” अॅग्रोवन हा मित्र, जागल्या आणि वाटाड्या कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी ‘अॅग्रोवन’च्या कार्याचे कौतुक केले. “शेतकऱ्यांचा मित्र, कृषी विद्यापीठांचा वाटाड्या आणि शासनाचा जागल्या अशा तीन मोठ्या भूमिका अतिशय जबाबदारीने ‘अॅग्रोवन’ पेलतो आहे. जगातील एकमेव कृषी दैनिकाचा हा उपक्रम चालेल की नाही अशी शंका सुरुवातीला उपस्थित केली गेली. पण, आज ‘अॅग्रोवन’ राज्यभर पसरला आणि ज्ञानाचा जागर बनला. अशा कृषी प्रदर्शनातून हा ज्ञान प्रसार सतत वाढतो आहे.”   “कोणाच्या भरवशावर हा देश पोसायचा,” असा प्रश्न उपस्थित करीत डॉ. ढवण म्हणाले की,  “शेतीची सध्याची दुरवस्था राष्ट्राला परवडणारी नाही. शेतकऱ्यांसाठी आता परतीचा दोर तुटला असून आपल्याला लढावेच लागेल. ही लढाई जिंकण्याची भूमिका घेऊन विद्यापीठे, शासन काम करते आहे. त्यात ‘अॅग्रोवन’देखील खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे.” जिद्दी शेतकऱ्यांना सलाम ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी जगाची भूक भागविण्यासाठी शेतकरी जिद्दीने लढत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “सतत पडणाऱ्या दुष्काळानंतरही मराठवाड्यातील शेतकऱ्याचे शेतीवरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. तो सतत लढतोच आहे. त्याच्या या जिद्दीला सलाम करावासा वाटतो. ही उमेद आणि ऊर्मी कोठून येते हेदेखील रहस्य आहे. पाऊस पडेल की नाही, पीक येईल की नाही, याची त्याला काळजी असते. तरीही काळ्या माईचे उदर मोकळे न ठेवता तो पेरतो. जीवनाची लढाई सकारात्मक पद्धतीने कशी करावी, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपला कष्टकरी शेतकरी होय,” असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. या वेळी महाऊर्जाच्या सोलर डिव्हिजनचे व्यवस्थापक विकास रोडे, औरंगाबाद एमआयटीचे उपसंचालक प्रा. दीपक बोरनारे, सकाळ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड, फळबाग तज्ज्ञ भगवानराव कापसे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, आत्माचे प्रकल्प संचालक पी. बी. आव्हाळे, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एस. व्ही. सोनवणे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. टी. जाधव, प्रगतशील शेतकरी संजय मोरे, दीपक जोशी, सिकंदर जाधव, दीपक चव्हाण, कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे आदी उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी केले; तर आभार ‘अॅग्रोवन’चे मुख्य व्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी मानले.   कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ... शेतकरी आणि शहरवासीयांची गर्दी 'सकाळ अॅग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पहिल्याच दिवशी अभ्यासू शेतकरी तसेच शेतीविषयी उत्सुकता असलेल्या शहरवासीयांनी गर्दी केली. यात महाविद्यालयीन तरुणांचादेखील समावेश होतो. या प्रदर्शनाला मोफत प्रवेश दिला जात असून रोज निघणाऱ्या लकी ड्रॉमुळे विविध बक्षिसे जिंकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते आहे. पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे, प्रकिया उद्योग, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाउस तंत्रज्ञानातील कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. मराठवाड्यातील दुष्काळाशी बळिराजा जिद्दीने लढतो आहे. या लढाईला साथ देण्यासाठी ‘सकाळ-अॅग्रोवन’कडून मराठवाड्यात भरविल्या जात असलेल्या कृषी प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com