अवघ्या १८ व्या वर्षी चित्रकार प्रेम आवळेची इंचलकरंजी ते इटलीपर्यंत झेप !

चित्रकार प्रेम आवळे
चित्रकार प्रेम आवळे

पुणे : लहानपणापासून तो शेती, नदीकाठावर रमला. निसर्गानेच त्याला चित्रांची दृष्टी दिली. पाटी-पेन्सिल मग शाळेत कागदावर खडूने निसर्ग चित्रे तो रंगवू लागला आणि आता रिअलॅस्टिक पोर्ट्रेटकडे (व्यक्तिचित्रे) वळलाय. कोणीही गुरू नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही की मान्यवर चित्रशाळेचा हा विद्यार्थी देखील नाही. मात्र एखाद्या प्रतिभासंपन्न चित्रकाराच्या धाटणीची शैली त्याच्या चित्रांमधून झळकते. म्हणूनच केवळ कल्पना, आकलनशक्ती आणि स्वकर्तृत्वाने जागतिक स्तरावरील पोर्ट्रेट स्पर्धेत अवघ्या अठराव्या वर्षीच तो इटलीतील जगप्रसिद्ध फ्लोरेन्स ॲकॅडमी ऑफ आर्ट या संस्थेत पोचलाय...!

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील प्रेम संजय आवळेची ही आश्‍वासक वाटचाल सर्वांनाच आश्‍चर्यचकीत करेल अशीच आहे. पुण्यातील दिघी परिसरात प्रेम सध्या राहतो. वडील वॉचमनची नोकरी करतात, तर आई घरकाम करते. परंतु मुलाच्या हातातील कला आणि इच्छाशक्ती लक्षात घेऊन त्यांनी सर्व अडचणी बाजूला सारून त्याला साथ दिली. त्याच जोरावर प्रेम सध्या फ्लोरेन्स ॲकॅडमीमध्ये जागतिक स्तरावरील पोर्ट्रेट कलाकारांकडून धडे गिरवतोय. 

निसर्ग आणि आजूबाजूची माणसं हेच त्याचे गुरू. लिओनार्डो व्हेंची, मायकेल अंजलो, राजा रवी वर्मा हे त्याचे आदर्श. आपल्या या चित्रकलेच्या प्रवासाबाबत प्रेम आवळे म्हणाला, की मी चौथीपर्यंत इचलकरंजी शहरात वाढलो. वडील सूतगिरणी कामगार आणि आई बालवाडीत नोकरी करायची. लहानपणापासून मला चित्रांची आवड. पंचगंगा नदीचा परिसर, आजूबाजूची शेती, शेतकऱ्यांची चित्रे मी रेखाटू लागलो आणि तो माझा छंद झाला. पाटी-पेन्सिल, त्यानंतर रंगीत खडू आणि आता पोर्ट्रेट असा माझा प्रवास झालाय. सूत गिरणीमधील नोकरी गेल्याने माझे वडील कुटुंबासह पुण्यात आले.

पुण्यात आल्यानंतर माझ्या चित्रकलेला गती मिळाली. सातत्याने चित्र प्रदर्शने पाहायचो, सहभागी व्हायचो. त्यातून माझी दृष्टी बदलत गेली. मी रिअलॅस्टिक पोर्ट्रेट आणि मॉडर्न आर्ट या दोन्ही प्रकारांत काम करतो. पोर्ट्रेटमध्येच मला करियर करायचे आहे. आतापर्यंत मी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथील प्रदर्शनात सहभागी झालो आहे. शिक्षणाच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी मी पेन्सिल स्केच, चारकोल स्केच, डिटेल पेन्सिल स्केच आणि ऑइल पेंट पोर्ट्रेट करून देतो, असे प्रेमने सांगितले. 

हे सर्व करत असताना मला इटलीमधील जगप्रसिद्ध फ्लोरेन्स ॲकॅडमी ऑफ आर्ट या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट स्पर्धेची माहिती मिळाली. ही ऑनलाइन स्पर्धा होती. त्यासाठी मी महाराष्ट्रीयन नववधूचे पोर्ट्रेट पाठविले. पोर्ट्रेटला मी ‘ऑस्पिशियस मूव्हमेंट’ असे नाव दिले. या स्पर्धेसाठी जगभरातून दोन हजारांहून अधिक पोर्ट्रेट आली होती. त्यातील पहिल्या दहामधून शिष्यवृत्तीसाठी तिसऱ्या क्रमांकासाठी माझे पोर्ट्रेट निवडले गेले. यंदाच्या पोर्ट्रेट स्पर्धेसाठी निवडला गेलेला मी एकमेव भारतीय युवा चित्रकार आहे. मला शिष्यवृत्तीच्या स्वरूपात फ्लोरेन्स ॲकॅडमी ऑफ आर्टमध्ये १ जुलै ते २६ जुलै या काळात पोर्ट्रेट शिकण्याची संधी मिळाली आहे. तेथे राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च काही प्रमाणात मी आणि माझ्या हितचिंतकांनी उचललाय, असे प्रेम शेवटी म्हणाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com