यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता

राज्याच्या गाळप हंगामाला लागणाऱ्या ऊसपुरवठ्यात कोल्हापूर, गलीचे स्थान मोलाचे असते. महापुरानंतर तेथील ऊस शेतीचे निश्चित किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज येणे महत्त्वाचे आहे. नुकसानीची अंतिम माहिती हाती आल्यावर हंगामाची गणिते निश्चित होतील. अर्थात, गाळप नियोजनाच्या दृष्टीने मंत्री समितीची बैठक घेण्याबाबत आम्ही शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त
साखर कारखाना
साखर कारखाना

पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या अंदाजापेक्षाही अजून घटण्याची भीती आहे. त्यामुळे गाळप हंगामाला यंदा नोव्हेंबरपासून सुरवात होण्याची शक्यता आहे; तसेच किमान ५० कारखाने यंदा बंद राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात १९५ कारखान्यांना ९५२ लाख टन ऊस पुरविला होता. यातून १०२ सहकारी आणि ९३ खासगी कारखान्यांनी १०७ लाख टन साखर तयार केली. यंदाचे चित्र मात्र गुंतागुंतीचे आहे. राज्याच्या एका भागात दुष्काळ; तर दुसऱ्या बाजूला पुरामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आधीच्या अंदाजानुसार यंदा ८४३ लाख टन ऊस मिळण्याची शक्यता होती. मात्र पूर आणि दुष्काळी स्थितीमुळे अंदाज विस्कळित झाल्याने अंतिम ऊस उपलब्धतेबाबत उत्सुकता वाढली आहे.  “राज्यात किमान ५० कारखान्यांची धुराडी यंदा पेटणार नाहीत. उपलब्ध ऊस बघता १०० कारखान्यांमध्ये देखील गाळप पूर्ण होऊ शकते. मात्र, राजकीय पक्षांशी संबंधित कारखान्यांना मतदारसंघातील गणिते जुळवण्यासाठी रडतखडत कारखाने चालवावे लागतात. त्यामुळे आवश्यकता नसतानाही काही कारखाने सुरू केले जातात. यंदाही तसे होईल. तरीही कारखान्यांची एकूण संख्या दीडशेच्या आसपासच राहील,” अशी माहिती साखर उद्योगातून देण्यात आली.  गेल्या हंगामात दीड लाख हेक्टरवर कोल्हापूर; तर ९० हजार हेक्टरवर सांगलीतील शेतकऱ्यांनी ऊस लावला होता. राज्याच्या यंदा फक्त कोल्हापूर, सांगली भागात किमान १२ हजार हेक्टरने क्षेत्र वाढण्याचा अंदाज होता. मात्र, महापुरामुळे वाढीपेक्षाही मोठी हानी पदरात पडल्याने गाळपाचे नियोजन बिघडणार आहे.  यंदाच्या गाळप हंगामासाठी ऑगस्टअखेर अर्ज करण्याच्या सूचना राज्यातील साखर कारखान्यांना दिल्या गेल्या होत्या. मात्र, अजून एकही अर्ज आलेला नाही. अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्यास एक आठवड्यात ऑनलाइन परवाना मिळणार आहे. मंत्रिसमितीची बैठक व परवाना वाटप याचा संबंध यंदा तोडण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यांची मोठी अडचण दूर होणार आहे. हंगाम सुरू करण्याबाबत दोन मतप्रवाह पूरस्थितीमुळे हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, उतारा कमी मिळण्याच्या भीतीने कारखानदारांचा कल हंगाम लांबणीवर टाकण्याकडे आहे. त्यामुळे मंत्री समितीच्या बैठकीनंतरच ही संभ्रमावस्था मिटण्याची शक्यता आहे. समितीची बैठक यंदा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याचा अंदाज असून नोव्हेंबरपासून गाळप सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com