सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता

अतिवृष्टीचा फटका केळी लागवडीस बसला आहे. सन २०१८-१९ मध्ये १०२२ हेक्टर इतके केळीचे क्षेत्र असून २०२०-२१ मध्ये ९२० हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड झाली. अर्थात केळीचे क्षेत्र १०२ हेक्टरने घटले आहे.
Possibility of decline in banana area in Sangli
Possibility of decline in banana area in Sangli

सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या अतिवृष्टीचा फटका केळी लागवडीस बसला आहे. सन २०१८-१९ मध्ये १०२२ हेक्टर इतके केळीचे क्षेत्र असून २०२०-२१ मध्ये ९२० हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड झाली. अर्थात केळीचे क्षेत्र १०२ हेक्टरने घटले आहे.

तसेच गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूचे संकट असल्याने केळीच्या दरात सुधारणा नाही. त्यातच आता कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनचे संकट ओढावले आहे. त्यामुळे केळीच्या दरात प्रति किलोस २ ते ३ रुपयांनी घट झाली आहे. केळी उत्पादकांवर दुहेरी संकट आल्याने केळी उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे केळीच्या लागवडीत घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.  जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी केळीची निर्यात देखील करतात. गेल्या दोन वर्षांपूर्वी केळीला प्रति किलोस १२ ते १३ रुपये असा दर मिळाला होता. प्रामुख्याने केळीची लागण व खोडवा अशी दोन हंगाम घेतले जातात. त्यामुळे केळीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. यामुळे दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात अतिवष्टी झाल्याने केळीच्या लागवडीत घट असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला. त्यावेळी दिर्घकाळ बाजारपेठा बंद होत्या, त्यामुळे केळीच्या मागणीत घट झाली होती. परिणामी केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. एप्रिलच्या दरम्यान, केळीस प्रतिकिलोस ५ ते ६ रुपये असा दर मिळाला होता. हा दर सुमारे वर्षभर कायम होता. हवामानाचा संकटाचा फटका बसल्याने केळी उत्पादक अडचणीत आले होते. उरल्या सुरल्या केळीच्या खोडव्यातून उत्पादन घेण्यास शेतकरी धजावत नव्हते. उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने काही शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आकडेवारीवरुन दिसते.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सुमारे ९०० हेक्टरवर केळीची लागवड आहे. गेल्या महिन्यापासून केळीस प्रति किलोस ११ ते १२ रुपये असा दर मिळला. दरम्यान, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या आठवड्यात लॉकडाउन बाबत सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत केळीच्या मागणीत घट झाली. परिणामी केळीच्या दरातील घसरण सुरू झाली. सध्या केळीला प्रति किलोस ८ ते ९ रुपये असा दर मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर कमी असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून केळीची खरेदी देखील थांबली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या केळीचे करायचे काय असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

गेली वर्षभर केळीचे दर कमी होते. त्यामुळे अगोदरच आर्थिक मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याभरात केळीच्या दरात सुधारणा झाली होती. परंतु आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाउन करण्याची भूमिका सरकारने घेण्याचा विचार केल्याने केळीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आर्थिक झालेले नुकसान कसे भरून काढायचा असा प्रश्न आहे. - प्रशांत शिंदे,केळी उत्पादक शेतकरी, आष्टा, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com