‘पोकरा’च्या शेळ्या-मेंढ्याची तपासणी होण्याची शक्यता

पोकरा बकऱ्या
पोकरा बकऱ्या

अकोला ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्याने यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकल्पातून खरेदी केल्या जाणाऱ्या शेळ्या मेंढ्याबाबत या पुढील काळात अधिक दक्षता बाळगली जाणार आहे. शिवाय आता यापूर्वी लाभ दिलेल्या शेळ्या-मेंढ्या घटकांची तपासणी कसोशीने होण्याची चिन्हे आहेत.  राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये तसेच खारपाण पट्ट्यातील गावांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत आधीच कृषी खात्यातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ओढाताण होत आहे. प्रकल्पातील योजनांची कृषी अधिकाऱ्यांकडून उद्दिष्टपूर्ती करून घेणे सुरु आहे. काही ठिकाणी योजनांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्या जात आहे. अनुदान लाटण्यासाठी शेळ्यांची खरेदी दाखविली जात असल्याने क्षेत्रीय पाहणीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना शेळ्या-मेंढ्या लाभार्थ्याकडे नसल्याचे धक्कादायक वास्तव बघायला मिळते आहे. असे प्रकार समोर आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात त्याबाबत वाच्यता होऊ लागली आहे.  प्रकल्पातून दिल्या जाणारा शेळ्या-मेंढ्या हा घटक निराधाराला वर्षभर आधार मिळावा, रोजगार उपलब्ध व्हावा या चांगल्या उद्देशाने वाटप केल्या जातो. परंतु काही झारीतील शुक्राचार्य लाभार्थ्यांना हाताशी धरून अनुदान लाटत असल्याची शंका घेतली जात आहे. एका चांगल्या प्रकल्पात सुरुवातीच्या टप्प्यातच अशी प्रकरणे घडत असल्याने तातडीने कठोर कारवाईची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे.  पोकरा प्रकल्पाबाबत अकोला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी १९ सप्टेंबरला काढलेल्या पत्रात प्रकल्पाची मापदंडानुसार योग्य ती अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट म्हटले आहे. जिल्ह्यातील ४२५ गावांत वेगवेगळ्या घटकांतून पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत केले जात आहे. हे अनुदान वितरीत करताना मार्गदर्शक सूचनेनुसार विहित प्रपत्रात तपासणी होत नसल्याने प्रकल्पाच्या कामात गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येत असल्याची बाब मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने प्रत्येक टप्प्यावर मापदंडाप्रमाणे क्षेत्रीय व कागदपत्रांची तपासणी करून परिपूर्ण प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा. प्रत्येक घटकासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जावी. या प्रकरणी कर्तव्यात कसूर, काही अनियमितता, गैरप्रकार झाल्याचे व शासनाचे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या क्षेत्रीय पाहणीत गैरप्रकार, अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही जिल्हा अधिक्षकांनी दिले आहेत. 

शेळ्या-मेंढ्या महामंडळाकडून खरेदीची सूचना वैयक्तील लाभाअंतर्गत शेळीपालन या घटकाची खरेदी संबंधितांनी अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळ (पोहरा जि. अमरावती) येथून करण्याचे सुचविण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त सर्व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामकृषी संजीवनी समिती अंतर्गत असलेल्या खरेदी समिती सदस्यांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com