राजू शेट्टींच्या पराभवासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता

राजू शेट्टींच्या पराभवासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता
राजू शेट्टींच्या पराभवासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत केवळ मतदारसंघातच नाही तर देशपातळीवर शेतकऱ्यांचे संघटन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना अडचणीत आणण्यासाठी आता भाजपबरोबरच इतरांनीही व्यूहरचना करण्यास सुरवात केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून श्री. शेट्टी यांनी खासदारकीवर निर्विवाद वर्चस्व राखल्याने आता भाजपा-शिवसेनेसह स्वाभिमानीतून फुटून बाहेर पडलेले घटकही त्यांच्या विरोधात सरसावले आहेत. यामुळे हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. 

‘स्वाभिमानी’ने कॉंग्रेस आघाडीकडे राज्यातील इतर जागांची मागणी केली आहे. स्वत: हातकणंगलेची जागा तेच लढणार आहेत. जरी आघाडी झाली नाही तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षही या जागेवर स्वत:चे उमेदवार उभे करतील ही शक्‍यता कमी आहे. भाजपला विरोध करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस शेट्टींना बळ देण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या पाच वर्षांचा इतिहास पाहिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही फुटीरतेने ग्रासले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी लढणारा शेतकरी संघटनांचा एक मातब्बर नेता अशी ओळख मतदारसंघाबरोबर राज्यातही आहे. पण त्यांचे प्राबल्य असणाऱ्या हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातच बंडखोरी त्यांच्या वाट्याला आलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांनी शिवसेनेत जाऊन आमदारकी मिळविली. तर सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचा नेता म्हणून राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळविले. पण मंत्रिपद मिळविल्यानंतर ते स्वाभिमानीपासून दूर झाले. याचबरोबर तालुका स्तरावरील काही कार्यकर्तेही त्यांच्यापासून लांब झाले. या घटना शेट्टी समर्थकांना रुचल्या नाहीत. 

माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांची उमेदवारी शिवसेनेकडून पक्की झाली आहे. पण सदाभाऊ खोत यांनाही त्यांच्या विरोधात उतरवता येईल का याबाबत भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पण माने किंवा खोत यापैकी एकजण नक्की त्यांना टक्कर देण्यासाठी उभा राहू शकतो. शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्‍न हाताळल्याने विजयी होण्याचा विश्‍वास श्री. शेट्टी यांना आहे. पण कोणत्याही परिस्थितीत श्री. शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी शेट्टींचे सर्व विरोधक एकत्र येऊन प्रयत्न होत आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या विश्‍वासावर श्री. शेट्टी हे सलग तिसऱ्यांदा बाजी मारणार की विजयी रथ रोखला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शेट्टींच्या ‘बॅटिंग’कडे लक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी बॅट हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटिंग करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com