मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणका

गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मॉन्सूनोत्तर पावसाने मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, विदर्भातील बुलडाणा, वाशीमजिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने खरिपातील पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ झाली आहे.
Post-monsoon rains hit crops
Post-monsoon rains hit crops

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मॉन्सूनोत्तर पावसाने मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने खरिपातील पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

राज्यातून परतीचा पाऊस परतल्याने उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढला होता. त्यातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू केली होती. मात्र पावसासाठी पुन्हा वातावरण बनल्याने शनिवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला. सायंकाळी मराठवाड्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील कयाधू नदीला चांगलाच महापूर आला होता. 

यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून गेल्याने मोठे नुकसान असून काढणीत ही अडथळे निर्माण झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनची काढणी करणाऱ्या मजुरांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेकांचे सोयाबीन भिजल्याने हाती आलेला घास हिरावला आहे.

अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी अनेक ठिकाणी झालेल्या जोराच्या पावसामुळे कपाशी पिकांत चांगलेच पाणी तुंबले होते. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांतील २७ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यापैकी १० मंडलांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. विदर्भातही बुलडाण्यातील २९ मंडळांत पुन्हा अतिवृष्टी झाली असून, सर्वाधिक १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद येथे झाली. 

यवतमाळमध्येही शेंबाळपिंपरी महसूल मंडळात ८० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मराठवाडा व विदर्भात रविवारी उन्हाच्या चटक्यासह अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत होते. खानदेशात व उर्वरित भागातही काही अंशी अशीच स्थिती कायम होती.

मंडलनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : औरंगाबाद : गोळेगाव ४७.५, अजंठा ५६.५, सोयगाव ४०, सावलदबारा ५०.५. जालना : भोकरदन ५१, दावडा ५१.३, आनवा ५४.०, केदारखेडा ५२.५, माहोरा ५०.८, रामनगर ५०.५, पंचनवडगाव ९७.८, रांजनी ५१. बीड : गंगामसळा ४८, नागापूर ४८.३, पिंपळगाव गाडे १०३.५. लातूर : लातूर ६२.८, बाभळगाव ८७.५, हरंगुळ ६७.०, कनेरी ६३.३, बाडा ५०.३, बेलकुंड ४८.८, लामाजंना ४४, किल्लारी ४०.३, निलंगा ४६.५, औरड ५९.८, कासारबाळकुंडा ९१, कासारशिर्शी ६७.८ उस्मानाबाद : डाळिंब ४७, मुरूम ४१. नांदेड :  कुंडलवडी ८६.८, तळणी ११६.८, निवघा १००.३, मंथा १११.८, तामसा ६९, पिंपरखेड ६६.८, आष्टी ७२.३,  परभणी : पाथरी ४०.५, कासापुरी ४७, जिंतूर ४२.८, सांगवी ६२.५, बामनी ६३.५, वांगी धानोरा ५२.८, शेळगाव ६८.८, मोरगाव ५४.०, मानवत ५१.५,  हिंगोली : हिंगोली १०९.५, नारसी ८४.५, सिरसम ७९.८, बासामाबा ८६.३, दिग्रस काऱ्हाळे ८३, कळमनुरी १४३, वाकोडी १२१, नांदापूर १०३, आखाडा बाळापूर ११७.३, डोंगरकडा ७६.३, वारंगा ११४, येहाळगाव ७०.३,  सेनगाव ६०.३, बुलडाणा : उंद्री ६६.३, हातनी ६६.५, साकाळी ८३.८, देऊळघाट ६९.८, मेहकर, ७८.५, जानेफळ ७०, हिरवा आश्रम १०४.३, डोनगाव १०१.३, देऊळगाव माळी ९८.८, लोणी ९२.८, अंजनी ९४, हिरडाव १६४.३, अकोला : मालेगाव बाजार ८०, पातूर ६०.४, वाशीम : रिसोड ८९.३, भार जहागीर ९२.५, वाकड ९१.८, गोवर्धन ११३.०, मानोरा ११२.८, गिरोळी ७०, उमरी ७५.

विदर्भात हलक्या पावसाची शक्यता  गेल्या दोन दिवसापासून अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण बनल्याने जोरदार पाऊस पडला. आज (ता. १८) राज्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे. यामुळे विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशीम या जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com