थंडाव्यामुळे ब्रॉयलरच्या खपात सुधारणा, तेजीला आधार

मुंबईला मॉन्सून जोरदार बरसला, तर एक-दोन दिवस पुरवठा विस्कळित होतो. मात्र त्यानंतरच्या पुढच्या दिवसांमध्ये वातावरणात थंडावा निर्माण होऊन खपात जोरदार वाढ होते. - श्रीकृष्ण गांगुर्डे, उपाध्यक्ष, पीएफबीए महाराष्ट्र.
पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

ब्रॉयलर कोंबड्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मुंबईसह उर्वरित राज्यांत ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्याने उष्मा कमी झाला आहे. परिणामी, खपात सुधारणा होत असून, तेजीला आधार मिळाला आहे.

शनिवारी (ता. २) रोजी बेंचमार्क नाशिक विभागात ८५ रु. प्रतिकिलो ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. यासंदर्भात नाशिकचे पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की बाजारात एकूणच चांगली मागणी आहे. मोठ्या पक्ष्यांचा पुरवठा अजूनही कमी प्रमाणात दिसतोय. रमजानमुळे बाजारभाव आणखी सुधारेल. ईद १६ जून रोजी आहे. तोपर्यंत बाजार सकारात्मक असेल. मॉन्सूनचे आगमन आणि तापमानातील घट हे खपवृद्धीसाठी अनुकूल ठरतील.

बाजारभावाच्या दृष्टीने जून महिना ठीक जाईल, असे पोल्ट्री फॉर्मर्स ॲन्ड ब्रीडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे म्हणाले. मुंबईला जर जोरदार पाऊस झाला, तर एक-दोन दिवस पुरवठा विस्कळीत होतो. मात्र, त्यानंतर पुढच्या दिवसांमध्ये वातावरणात थंडावा होऊन खपात जोरदार वाढ होते. माॅन्सूनचे अागमन हे बाजाराचे सेंटीमेंट सुधारण्यासाठी पूरक ठरते. घरगुती अाणि हाॅटेलमधील चिकनच्या खपात पहिल्या पावसानंतर नेहमीच वाढ पाहायला मिळते, असे निरीक्षणही श्री. गांगुर्डे नोंदवले.

दक्षिण भारतातील बाजारसंदर्भात कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की दक्षिण भारतात सर्वत्र बाजार स्थिर असून, ८३ ते ८६ च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. ईदपर्यंत याच रेंजमध्ये बाजार असेल. मात्र, त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाजारात नरमाई येईल. सुट्यांचा हंगाम संपून शाळा सुरू होताहेत. या काळात सामान्यत: खप कमी होतो. निपाह विषाणूच्या अफवेमुळे अकारण चिकन विक्रीला फटका बसला. २० ते २५ टक्क्यांनी विक्री घटली. तथापि, राज्य सरकारने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करून स्पष्टीकरण दिल्यानंतर खप पूर्ववत होताना दिसतोय.

गेल्या आठवडाभरात हॅचिंग एग्जचे दर प्रतिनगामागे दोन रुपयांनी, तर पिलांचे भाव प्रतिनग तब्बल चार रु. ने उतरले आहेत. सध्याची प्लेसमेंट श्रावण सुरू होण्याच्या एक आठवडा आधी येईल. दर वर्षी या कालावधीत श्रावणपूर्व पॅनिक सेलिंग असते. त्यामुळे ओपन फार्मर्स प्लेसमेंटसाठी अनुत्सुक दिसत आहेत. टेबल एग्जच्या दरातील वाढ गेल्या आठवड्यातही कायम राहिली. प्रतिशेकडा दरात आठ रु. ने वाढ झाली आहे. यापुढील काळात वातावरण जस-जसे थंड होत जाईल, तशी खपवाढीला चालना मिळेल. एप्रिल-मेच्या तुलनेत जूनपासून पुढे थंड वातावरणामुळे एकूण खपात १५ ते २० टक्क्यांनी अंड्यांचा खप वाढतो.  

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ८६ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३४ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २२ प्रतिनग मुंबई
अंडी ३९३ प्रतिशेकडा पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com