उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त

उत्पादन नियंत्रित ठेवून, आर्थिक नुकसान कमीत कमी कसे होईल, याला प्रधान्य दिले पाहिजे. - कृष्णचरण, संचालक, कोमरला समहू
पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन
येत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने बाजारभाव उंचावेल, अशी धारणा पोल्ट्री उद्योगात दिसत आहे. आतापर्यंत तरी बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा झालेली नाही.
नाशिक विभागात शनिवारी (ता. २१) ६१ रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात फारशी वाढ - घट झालेली नाही. यापुढील काळात उन्हाळ्याची, पर्यायाने तापमानवाढीची तीव्रता किती राहते यावर बरेच काही अवलंबून आहे. गेल्या तीन वर्षांपासून तीव्र उन्हाळ्यामुळे ब्रॉयलर पक्ष्यांची वजने घटतात, उत्पादकता कमी मिळते, त्यामुळे बाजारातील पुरवठा कमी राहतो आणि उच्चांकी बाजारभाव मिळतात. अर्थात, दरवर्षाप्रमाणे याची पुनरावृत्ती होईल काय, याबाबत पोल्ट्री उद्योगामध्ये मतभिन्नता दिसत आहे.
औरंगाबादस्थित खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीकर म्हणाले, की १५ मे पासून अधिक मासारंभ आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच अधिक मासात उपवास पाळले जातात. मांसाहारी पदार्थांचा खप आपसूकच कमी होतो. ही बाब लक्षात घेऊन पोल्ट्री उद्योगाने संतुलित पुरवठ्याचे नियोजन केले आहे. तथापि, अल्पअवधीसाठी बाजारात पुरवठा अधिक आहे. येत्या पंधरा दिवसांत जसजसा पुरवठा संतुलित होत जाईल, तशी बाजारात सुधारणा दिसेल.
 
सध्याच्या पातळीवरून १५ ते १८ टक्क्यांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहेत. दरवर्षी मेचा पहिला आठवडा बाजारभावाच्या दृष्टीने किफायती असतो. मागील दोन- तीन वर्षांत मे महिन्यात बाजारात सर्वाधिक उंच पातळीची नोंद झाली आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
 
कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण यांनी सांगितले, की गेल्या तीन महिन्यांपासून बाजारभाव मंदीत राहत आहेत. ही बाब लक्षात घेता येत्या काळात वैयक्तिक पातळीवर उत्पादन नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. यामागील कारणे अशी आहेत. १) मागील दोन - तीन वर्षांमध्ये उन्हाळ्यामध्ये बाजारभाव किफायती राहतोय. मात्र, या वर्षी खूप नकारात्मक प्रचार आणि घटनांनी बाजार विस्कळित करून टाकलाय. सोशल मीडियावर चिकन संदर्भात तथ्यहीन गोष्टींचा प्रसार झाला, ज्यामुळे मागणीत काही अंशी घट दिसली आहे. २) मार्च महिना फारसा उष्ण नव्हता, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मार्चमधील वातावरण थंड राहिले. परिणामी, वजनरूपी पुरवठा वाढून बाजारभावातील मंदी आणखी सखोल झाली.
 
३) एकूणच ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगातील प्लेसमेंट ही सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. आधीच मागणी कमी असताना अशा प्रकारची उत्पादनवाढ ही मंदीत भर घालणारी ठरली आहे. ४) वातावरणातील चढ-उतारांमुळे उत्पादकता घटून पॅनिक सेलिंग वाढली आहे, ज्यामुळे बाजार आणखी खोलात गेला. ५) येत्या काळात एका दिवसाच्या पिलांची उपलब्धता वाढणार आहे. यामुळे एकूण पुरवठ्यात वाढच होईल. वरील सर्व परिस्थिती पाहता आर्थिक वर्ष १७-१८ मध्ये सरासरी मार्जिनमध्ये जी सुधारणा दिसली, तशी परिस्थिती आता १८-१९ मध्ये दिसत नाही आणि हे वास्तव स्वीकारण्याशिवाय अन्य पर्याय नाही. यातून मार्ग काढणे अवघड आहे. पण काही व्यवहार्य उपाययोजना शक्य आहेत का, याची पडताळणी केली पाहिजे.
 
आपण स्वंयस्फूर्तीने हॅचिंग एग्ज आणि पिलांची परराज्यांतून होणारी आयात थांबवू शकतो. यामुळे २० टक्क्यांपर्यंत प्लेसमेंट कमी होऊ शकते. अशाप्रकारे जर वैयक्तिक पातळीवर उत्पादन नियंत्रित झाले, तर मोठे आर्थिक नुकसान हे छोट्या नुकसानात रुपांतरित होईल, अशी भूमिका कृष्णचरण यांनी मांडली आहे.
 
 
प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ६१ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३५ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २७.५ प्रतिनग मुंबई
अंडी २८७ प्रतिशेकडा पुणे

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com