ब्रॉयलर्स बाजार वर्षातील उच्चांकी पातळीवर; अंडीही वधारली

साप्ताहिक पोल्ट्री समालोचन
साप्ताहिक पोल्ट्री समालोचन

गेल्या आठवड्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार वाढ झाली असून, बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीपर्यंत पोचले आहेत. दुसरीकडे, टेबल एग्जच्या दरातही आठवडाभरात आठ टक्क्यांवर वाढ झाली.

नाशिक विभागात शनिवारी (ता. १९) ९७ प्रतिकिलो रु.ने ब्रॉयलर्सचे लिफ्टिंग झाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव ११ रु. प्रतिकिलोने वाढले आहेत. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ब्रॉयलरचा पुरवठा घटला असून, खासकरून मोठ्या वजनाच्या मालाचा तुटवडा दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यामध्ये उन्हाळ्यात प्रतिपक्षी उत्पादकता वेगाने घटत आहे. खासकरून एप्रिल ते जून या कालावधीत एकूण वजनरूपी पुरवठा खूपच घटतो. त्यामुळे बाजारभाव उंचावला आहे.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, देशभरात ब्रॉयलर पक्ष्यांचे भाव तेजीत आहेत. दक्षिण भारताने या तेजीला चांगल्याप्रकारे बळ दिले आहे. आजघडीला हैदराबाद १०७ रु. प्रतिकिलो तर बंगळूर १०४ रु. प्रतिकिलोपर्यंत उंचावले आहे. उन्हाळ्याच्या प्रभावामुळे पुरवठ्यात घट असली, तरी काही तत्कालिक कारणांमुळेही खपवृद्धीला साह्य केले आहे.

उन्हाळ्यातील सुट्या, आयपीएल, कर्नाटकातील निवडणूक, रमजान आदींमुळे संस्थात्मक विक्री वाढली आहे. फार्म लिफ्टिंग दर शंभर रु. वर जातो तेव्हा घरगुती खप कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या पातळीवर थोडी फार घट होऊ शकेल, परंतु येत्या तीन आठवड्यांपर्यंत बाजारभाव किफायती राहण्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात विक्रीयोग्य पक्ष्यांची संख्या जास्त असली तरी त्यांचे वजने कमी आहेत. पर्यायाने पुरवठा नियंत्रणात असल्याने बाजार उंच पातळीवर राहण्यास मदत मिळत आहे.

गुजरात राज्यातील आणंदस्थित पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल म्हणाले, महाराष्ट्रातील बाजार उंचावल्याने गुजरात राज्यातही तेजीला बळ मिळाले आहे. फार्म लिफ्टिंग दर ९८ रु. प्रतिकिलोच्या आसपास आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे उत्पादन नियंत्रित झाले असून, आजही ४४ अंशांच्या वर पारा राहत आहे.

यामुळे पक्ष्यांचे वजन वाढण्याची प्रक्रिया जवळपास थांबली आहे. यामुळे सध्याची तेजी यापुढेही नियमित होण्याची संभावना आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. यामुळे काही प्रमाणात चिकनचा खप कमी होण्याची शक्यता होती मात्र, याच दरम्यान रमजान मासारंभ झाल्याने चिकनच्या खपाला आधार मिळाला आहे.

पुणे विभागात टेबल एग्जच्या फार्म गेट किमती आठवडाभरातच प्रतिशेकडा २५ रु. सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी १५ मे नंतर बाजारभाव सुधारण्याचा कल या वर्षीही कायम राहिला आहे. या वर्षी प्रथमच उन्हाळ्यात बाजारभाव किफायती राहिले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत उन्हाळ्यात हमखास उत्पादन खर्चाच्या खाली बाजार जात असे.

आजघडीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत सात ते आठ टक्क्यांनी बाजारभाव किफायती आहे. गेल्या आठवड्यात हॅचिंग एग्ज आणि एका दिवसांच्या पिलांचे बाजारभाव स्थिर होते.

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ९७ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३७ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २५ प्रतिनग मुंबई
अंडी ३६० प्रतिशेकडा पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com