वाहतूकदारांच्या संपामुळे कोंबड्यांची उपासमार

वाहतूकदारांच्या संपामुळे कोंबड्यांची उपासमार
वाहतूकदारांच्या संपामुळे कोंबड्यांची उपासमार

पुणे : वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा पोल्ट्री खाद्य वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. खासकरून, खाद्यासाठी लागणाऱ्या सोया ढेपेच्या गाड्या फीडमीलपर्यंत पोचू न शकल्यामुळे खाद्यटंचाई निर्माण झाली आहे.  अनेक पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांची उपासमार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे. गेल्या सात दिवसांपासून वाहतूकदारांचा संप सुरू आहे. सुरवातीचे चार दिवस संपाचा फटका बसला नाही. मात्र, त्यानंतर सोया ढेपेच्या गाड्या येणे बंद झाल्यामुळे खाद्यनिमिर्ती कारखान्यांची चाके थंडावली आहेत.  या संदर्भात, पुणे येथील ओम चिक्स इंडिया कंपनीचे चेअरमन राजेंद्र थोरात म्हणाले, की पोल्ट्री खाद्यात मका आणि सोयामील यांचा 80 टक्के वाटा असतो. त्यातील मका स्थानिक पातळीवर उपलब्ध होवू शकतो, मात्र सोया ढेप ही इंदूर किंवा धुळ्यासारख्या लांबवरच्या प्रोसेसिंग प्लांटवरून येत असते. येथून सोया ढेपेची पोच मिळण्यास दोन दिवस, त्यानंतर खाद्य तयार होण्याच्या प्रक्रियेत दोन दिवस आणि ते खाद्य पोल्ट्री फार्ममध्ये पोचवण्यासाठी एक दिवस, पाच-सहा दिवसांची प्रक्रिया असते. सध्या हे चक्र ढप्प झाले असून, संप मिटल्यानंतही पुढील पाच दिवसांत खाद्याची मोठी चणचण भासणार आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सांगली हे महाराष्ट्रातील पोल्ट्रीचे प्रमुख विभाग आहेत. त्यापैकी पुणे आणि सांगली विभागात बाहेरील जिल्ह्यातून मक्याची आवक होते, तर सोया ढेपेसाठी सर्वस्वी धुळे आणि इंदूर येथील मार्केटवर पोल्ट्री उद्योग अवलंबून आहे. पोल्ट्री, पशुखाद्य आणि तेलबिया गाळपाशी संबंधित सर्व संघटनांनी तातडीने सरकारशी बोलून संपावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सध्या ब्रॉयलर पोल्ट्री उद्योग मंदीच्या तडाख्यात सापडला असून, त्यात खाद्यटंचाई निर्माण झाली आणखी अडचणी वाढतील, असे नाशिकस्थित पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके यांनी म्हटले आहे. धुळे येथील महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्रा. लि.चे मनोज अग्रवाल म्हणाले, की पोल्ट्री फीडमिलपर्यंत सोया ढेप पोचवण्यासाठी वाहने उपलब्ध होत नाहीत. दैनंदिन पातळीवर सोयाबीन गाळप करून सोया ढेपे पाठवली जाते. संपामुळे आता सोया ढेपेचा अतिरिक्त साठा निर्माण होत असून, तो ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे गाळप प्लॅंट बंद ठेवण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com