पोल्ट्रीधारक करणार रविवारी जंतरमंतरवर हल्लाबोल

पोल्ट्रीधारक करणार रविवारी जंतरमंतरवर हल्लाबोल
पोल्ट्रीधारक करणार रविवारी जंतरमंतरवर हल्लाबोल

नागपूर ः पशुखाद्यात झालेली वाढ परिणामी वाढता उत्पादकता खर्च आणि त्या तुलनेत अंड्याच्या दरातील घसरणीमुळे मेटाकुटीस आलेले पोल्ट्रीधारक रविवारी (ता. १५) दिल्लीतील जंतरमंतरवर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ आंदोलकांनी मागितली असून, थेट त्यांच्यासमोरच या उद्योगातील अडचणी मांडण्याचा पोल्ट्रीधारकांचा विचार आहे. 

देशासह महाराष्ट्रातील मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून, मध्य प्रदेशातून येणाऱ्या मक्‍यावरच पोल्ट्रीधारकांची भिस्त उरली आहे. मध्य प्रदेशातील पुरवठादारांनी तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर दरात वाढ केली आहे. त्यामुळे अंड्याचा उत्पादकता खर्च प्रतिनग ४ रुपयांच्या वर पोचला आहे. तर अंड्याचे विक्री दर तीन रुपये २० ते ३० पैसे आहेत. उत्पादकता खर्च आणि विक्री किंमत याचा ताळेबंद जुळत नसल्याने पोल्ट्रीधारकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने यामध्ये हस्तक्षेप करीत पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुदानविषयक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी देशभरातील पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे. याच मागण्यांच्या पूर्ततेकरिता देशभरातील पोल्ट्री व्यावसायिक रविवारी (ता. १५) जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार  आहेत. 

बिहार, उत्तर प्रदेश, हैदराबाद, हरियाना, पंजाब, हिमाचल, राजस्थान या सात राज्यांतील पोल्ट्रीधारक पहिल्या टप्प्यात या आंदोलनात सहभागी होणार आहेत. न्याय न मिळाल्यास त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्याचा मानसही पोल्ट्रीधारक संघटनेच्या सदस्यांनी व्यक्‍त केला.

अशा आहेत मागण्या

  • व्यवसायासाठी घेतलेल्या बॅंक लोनवरील व्याजात सवलत मिळावी
  • उद्योगाकरिता अनुदान जाहीर करावे 
  • सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत असलेले अन्नधान्य अनुदानित दरावर मिळावे
  • हरियानातील बरवाला बाजारपेठेत अंड्याचे दर ठरतात. त्याच ठिकाणी अंड्याचे दर कमी काढले जातात. गुंतवणूक कमी करण्याकरिता त्यांच्याद्वारे अंड्याचे वितरकांकडून हे षडयंत्र रचले जात आहे. हेच वितरक ४० ते ४५ पैसे वाढवून ते विक्री करतात. अशा अनैतिक प्रकारावरदेखील सरकारचे नियंत्रण असावे, अशी मागणी आहे. जंतरमंतरवर आम्ही अशाच मागण्या घेऊन आंदोलन करणार आहोत. दिल्लीनजीकच्या राज्यातील पोल्ट्रीधारकांचा पहिल्या टप्प्यातील आंदोलनात सहभाग घेतला आहे.  - प्रमोद गुप्ता, कार्यकारी संचालक, पानिपत पोल्ट्री असोसिएशन, हरियाना.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com