चंदगड, आजरा, गडहिंग्लजमध्ये पोल्ट्रीला १२ कोटींचा फटका

poultry
poultry

चंदगड, जि. कोल्हापूर ः कोरोना व्हायरसच्या अफवेचा पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाला असून चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील पोल्ट्री व्यावसायिकांना सुमारे बारा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हे नुकसान भरून येणारे नसल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. ८० रुपयांचा पक्षी १० ते २० रुपयांत आणि १५० रुपयांचे चिकन अवघ्या ४० रुपये किलोने विक्री केले जात आहे. चिकनमुळे कोरोना व्हायरस पसरतो या अफवेचा या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात शेतीला जोड धंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. कंपनीच्या अखत्यारीत आणि स्वमालकीचा अशा दोन प्रकारात हा व्यवसाय विभागला आहे. सातवणे, आसगाव, खामदळे, हेरे परिसरासह गडहिंग्लज तालुक्‍यात अत्याळ आणि आजरा तालुक्‍यात पेद्रेवाडी, कोवाडे, हजगोळी परिसरात स्वमालकीच्या व्यवसायात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गोवा आणि बेळगाव बाजारपेठेवर आधारित या व्यवसायात चांगला जम बसला होता. परंतु कोरोनामुळे गेल्या दहा वर्षांत जे मिळवले तेवढे एका दमात गमावल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. या तीन तालुक्‍यांत स्वमालकीच्या व्यवसायातून महिन्याला सुमारे सहा लाख पक्षी तयार केले जातात. दोन किलोचा एक पक्षी तयार करण्यासाठी खाद्य, औषधोपचार व इतर मिळून सुमारे २०० रुपये खर्च येतो. तयार झालेले पक्षी स्थानिक व्यापारी उचल करून ते गोवा व बेळगाव बाजारपेठेत विक्री असत. परंतु कोरोनामुळे या व्यापाऱ्यांनी अंग काढून घेतले आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना खाद्य व औषधांसाठी व्यावसायिकांनी बॅंका, पतसंस्थांकडून कर्जे उचलली आहेत. गावोगावी फिरून विक्री सध्या पक्षी पडून असल्याने उलाढाल थांबली आहे. जे पक्षी पोल्ट्रीमध्ये आहेत त्यांना जगवायचे म्हटले तर खाद्य खरेदी करण्यासाठी पैसा नाही अशी स्थिती आहे. अनेक पोल्ट्रीधारक टेंपोतून गावोगाव फिरून वीस रुपये दराने जिवंत पक्षी तर ४० रुपये किलो दराने चिकन विक्री करीत आहेत. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे नडलेल्या व्यापाऱ्याला ग्राहकही अडवत आहेत. दहा रुपयाला पक्षी द्या, अशी मागणी केली जात आहे. हजारोंच्या संख्येत पक्षी पडून आहेत. खाद्याअभावी ते मरण्यापेक्षा जी रक्कम येईल तेवढा तरी आर्थिक दबाव कमी होईल या अपेक्षेने अत्यल्प दराने पक्षी व चिकन विकले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com