`पोल्ट्री`ला दररोज ७० कोटींचा फटका 

बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्‍वभूमीवर चिकनची मागणी घटल्याने जिवंत कोंबडीच्या दरात २५ ते ३० रुपयांनी, तर किरकोळ विक्रीच्या दरात ४० ते ५० रुपयांनी घट झाली आहे.
`पोल्ट्री`ला दररोज ७० कोटींचा फटका 
`पोल्ट्री`ला दररोज ७० कोटींचा फटका 

नगर ः कोरोनाकाळात अफवेचा बळी ठरलेला पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्‍वभूमीवर चिकनची मागणी घटल्याने जिवंत कोंबडीच्या दरात २५ ते ३० रुपयांनी, तर किरकोळ विक्रीच्या दरात ४० ते ५० रुपयांनी घट झाली आहे. अंड्यांचे दरही नगामागे पन्नास पैसे ते एक रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज सत्तर कोटींचे नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर महिनाभरात सुमारे दोन हजार कोटींचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  राज्यातील नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील अनेक भागांत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योग केला जातो. मात्र कोरोना काळात केवळ अफवेमुळे राज्यात दोन हजार कोटीचा फटका उद्योगाला सोसावा लागला.  या संकटातून सावरत असतानाच पुन्हा एकदा बर्ड फ्लूचे संकट आले. परभणीपाठोपाठ नगर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर भागांतील काही ठिकाणी कोंबड्या व विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. काही भागांत मृत्यूचे कारण अजून स्पष्ट केले नसले तरी यंत्रणा सतर्क झाली आहे.  बर्ड फ्लूच्या कारणाने राज्यात चिकनची मागणी घटली आहे. चार दिवसांपासून जिवंत कोंबडीच्या दरात २५ ते ३० रुपये, तर किरकोळ विक्रीत ४० ते ५० रुपयांनी दर खाली आले आहेत. प्रति अंड्यामागे ५० पैसे ते एक रुपयाने घट झाली आहे. मागणी घटली आणि दरही कमी झाल्याने राज्यात दररोज सुमारे सत्तर कोटींचा फटका बसत आहे. केवळ अफवा आणि अपप्रचारामुळे हा फटका बसत असून तो थांबावा, असे आवाहन करतानाच पंधरा दिवसांनंतर परिस्थिती सुधारणार असल्याचा कुक्कुट उद्योगातील जाणकारांचा अंदाज आहे.   राज्यातील पोल्ट्री उद्योगाची स्थिती 

  • पोल्ट्री उत्पादक शेतकरी ः ५० ते ६० हजार  
  • महिन्याला कोंबड्यांचे उत्पादन ः ४ कोटी 
  • महिन्याला मांस उत्पादन ः ९ कोटी किलो 
  • देशी कोंबडी पालक शेतकरी ः १ लाख ५० हजार
  • महिन्याला देशी कोंबड्यांचे उत्पादन ः ८० लाख 
  • ब्रॉयलरचा पंधरा दिवसांपूर्वीचा दर ः ८५ रुपये प्रति किलो (जिवंत) 
  • दोन दिवसांपूर्वीचा दर ः ६० रुपये प्रति किलो (जिवंत) 
  • राज्यात अंडी उत्पादक शेतकरी ः १० हजार 
  • दररोजचे अंडी उत्पादन ः १ कोटी ५० लाख 
  • दररोजची मागणी ः २ कोटी ५० लाख 
  • अंडी दर (रुपये/शेकडा)

  • पंधरा दिवसांपूर्वी ः ४५० ते ५०० 
  • दोन दिवसांपूर्वी ः ३५० ते ४०० 
  • प्रतिक्रिया सध्या बर्ड फ्लू हा कावळे, बगळे आणि देशी कोंबड्यांत दिसून येत आहे. ब्रॉयलर कोंबडीचे पालन करताना सर्व काळजी घेतली जाते. त्यामुळे बर्ड फ्लूच्या आजाराने देशात एकाही ब्रॉयलर कोंबडीचा मृत्यू झालेला नाही. शिवाय खाताना मांस ७० डिग्रीत शिजवले जात असल्याने कसलाही व्हायरस त्यात राहू शकत नाही. केवळ अफवांवर विश्‍वास ठेवू नये. राज्य सरकारही काळजी घेत आहे. लवकरच परिस्थिती सुधारेल. - उद्धव अहिरे, सचिव पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशन, महाराष्ट्र

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com