खाद्य दरवाढीचा विदर्भातील पोल्ट्री व्यवसायाला फटका

माझ्याकडे सरासरी दीड लाखावर पक्षी राहतात. त्यातील ४५ ते ५० हजार पक्षी कमी केले आहे. या माध्यमातून ९० हजार रोजचे अंडी उत्पादन सद्या कमी करण्यावर भर दिला आहे. पशुखाद्यातील वाढत्या दरामुळे हा निर्णय घेतला. उत्पादकता खर्च वाढता असून सद्या सण, उत्सवामुळे अंड्यांना मागणी देखील कमी आहे. दिवाळीनंतर पक्ष्यांची संख्या वाढविली जाईल. सात एकरावर स्वतःच मका लागवड केली आहे. - रवींद्र मेटकर, मातोश्री पोल्ट्री फार्म, अंजनगावबारी, अमरावती.
पोल्ट्री
पोल्ट्री

अमरावती ः राज्यातील मक्‍यावर लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री उद्योगाला राज्यातून होणाऱ्या मक्‍याचा पुरवठा थांबला आहे. परिणामी, विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांची मध्य प्रदेशातून आवक होणाऱ्या महागड्या मक्‍यावरच भिस्त आहे. अंड्यांचा उत्पादकता खर्च यामुळे वाढीस लागल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कोंबड्यांचे संगोपन कमी केले असून दिवाळीनंतरच पोल्ट्री व्यवसायातील ही मंदी दूर होण्याची शक्‍यता व्यावसायिकांनी व्यक्‍त केली.  विदर्भात नजीकच्या काळात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायाला शेतकऱ्यांची; तसेच व्यावसायिकांची देखील वाढती राहिली आहे. सद्यस्थितीत सुमारे १५ लाख पक्ष्यांचे संगोपन या व्यवसायाच्या माध्यमातून होते.  अमरावती जिल्हा तर पोल्ट्रीचे हब म्हणून नावारूपास आला असून विदर्भातील १५ लाखांपैकी दहा लाख पक्ष्यांचे संगोपन एकट्या अमरावती जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून होते. अमरावती शहराच्या आजूबाजलाच या व्यवसायाचा विस्तार आहे. दीड लाखावर कोंबड्यांचे संगोपन एका-एका पोल्ट्री व्यवसायांकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  देशभरातील बाजारपेठेत या ठिकाणावन अंड्यांचा पुरवठा होतो. त्यामध्ये मुख्यत्वे मध्य प्रदेशातील इंदूरचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. सद्या मात्र कोंबडी खाद्याच्या दरात आलेल्या तेजीमुळे येथील व्यावसायिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मजुरी खर्चासोबतच पशुखाद्यातील आलेल्या तेजीचा फटका बसल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कोंबड्यांचे संगोपन कमी केले आहे. पोल्ट्री व्यावसायिक रावणकर यांच्याकडे वर्षभर १ लाख ६० हजार कोंबड्यांचे संगोपन होते. त्यांनी पशुखाद्य दरातील वाढीमुळे पक्ष्यांची संख्या १ लाखावर आणली आहे. त्यांच्याकडील दरदिवसाचे अंडी उत्पादन ८० हजार आहे. महाराष्ट्रातील जळगाव, बुलडाणा भागातून विदर्भात मका पुरवठा होतो; परंतु त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने आता केवळ मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून येणाऱ्या मक्‍यावर पोल्ट्री व्यावसायिकांची भिस्त आहे.   मध्य प्रदेशातील हा मका हैदराबाद भागात २६०० रुपये क्‍विंटल, अमरावतीत २४०० रुपये क्‍विंटल; तर  नाशिक, पुणे विभागात २५०० रुपये क्‍विंटलने पुरवठा होत आहे. पशुखाद्याच्या दरात वाढ झाली असली तरी  अंड्याचे घाऊक दर तीन रुपये आहेत. अंड्यांचा उत्पादकता खर्च चार रुपये असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने व्यावसायिकांनी त्यांच्याकडील पक्षीसंख्या कमी करण्यावर भर दिला आहे. दिवाळीनंतर अंड्यांना उठाव येणार असल्याने तोवर वेट ॲण्ड वॉचचे धोरण पोल्ट्री व्यावसायिकांनी अवलंबले आहे. 

खाद्याचे दर असे...

खाद्य   पूर्वी   आता
सोयाबीन ढेप (टन)   २५००० रुपये ३५००० रुपये
मका (क्विंटल) १३०० रुपये २४०० रुपये
तांदूळ चुरी (क्विंटल) १३०० रुपये  १९०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com