नगर जिल्ह्यात 'पोल्ट्री'चे ३०० कोटींपेक्षा अधिक नुकसान

कोरोना आणि चिकन, अंडी यांचा कुठलाही संबंध नाही. देशात चिकन, मटण शिजवून घेतले जाते. आपल्या देशात कोठेही मांस कच्चे खाल्ले जात नाही. शिजविलेल्या कोणत्याही पदार्थात हा विषाणू जगू शकत नाही. केवळ भीतीमुळे आपल्याकडे चिकन, अंडी खाणे बंद केले गेले आहे. याबाबत आम्ही जिल्हा पातळीवर जनजागृती करीत आहोत. — डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
poultry
poultry

नगर ः चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या चुकीच्या अफवेमुळे नगर जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. एकट्या नगर जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून सुमारे एक कोटी कोंबड्या मागणी नसल्याने पडून आहेत. आत्तापर्यंत शेतकरी आणि कंपन्यांचे सुमारे तीनशे कोटीपेक्षा अधिक तर केवळ शेतकऱ्यांचे दिडशे कोटी नुकसान झाले आहे. मागणी नसल्याने करार केलेल्या कंपन्या पोल्ट्री फार्मवरून पक्षी उचलण्यास तयार नाहीत. त्यामुळे सत्तर दिवस होऊनही मागणी नसल्याने व पुरेसे खाद्यही मिळत नसल्याने कोंबड्यांचा संभाळ करताना शेतकरी त्रस्त आहेत. ऊस आणि साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यामधील नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांनी पोल्ट्री व्यवसायाला पसंती दिली जात आहे. जिल्हाभरात देशी कोंबड्यांची बारा ते चौदा तर संकरित ब्रॉयलर कोंबड्याची साधारण सहा ते सात उबवणी केंद्रे आहेत. राज्यात सर्वाधिक नगर जिल्ह्यामध्ये २ हजार ८०० कुक्कुटपालन शेतकरी आहेत. त्यातून दर ४५ दिवसाला १ कोटी १२ लाख कोंबड्या आणि २२ लाख टन मांसाचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय सुमारे सत्तर ते अंशी लाख गावरान कोंबड्याचे उत्पादन घेतले जाते. २ हजार ८०० कोंबडी कुक्कुटपालक शेतकऱ्यांपैकी जवळपास सगळेच शेतकरी करार पद्धतीने कुक्कुट उद्योग करतात. बहुतांश कोंबड्याची पुणे, मुंबईला पुरवठा केला जातो. जिल्हाभरातही दर दिवसाला चार ते पाच लाख कोंबड्याची किरकोळ दरात विक्री होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णतः मागणी घटल्याने पोल्ट्री उद्योग अडचणीत सापडला आहे. जिल्हाभरात पाच लाखांऐवजी पन्नास हजार कोंबड्यांचीही विक्री होत नाही. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पोल्ट्री चिकनचे भाव १७० रुपये प्रतिकिलो होते, तर अंडी साडेचारशे रुपये शेकडा होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पोल्ट्री चिकनचे भाव (किरकोळ) ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत, तर अंड्यांचे भाव साडेचारशेवरून तीनशे ते साडेतीनशे रुपयांवर आले आहेत. जिवंत कोंबडीचा भाव थेट वीस ते तीस रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे एवढा कमी दर असूनही मागणी केली जात नाही. जुना उठाव नाही, नव्याने पिल्ले नाहीत करार पद्धतीने कुक्कुट उत्पादन करताना कंपन्या पिल्ले व खाद्य पुरवतात व दर किलोप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देतात. करार पद्धतीने बहुतांश ब्रॉयलर कोंबड्याचेच उत्पादन घेतले जाते. कोरोनाच्या भीतीने मागणी घटल्यामुळे विक्रीसाठी तयार असलेल्या कोंबड्याचा उठाव होत नाही. शिवाय कंपन्या नव्याने पिल्ले द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पुढील काळातही हा व्यवसाय संकटातच सापडणार आहे, असे कुक्कुट व्यावसायिक व उबवणी केंद्राचे चालक संतोष अंकुश कानडे यांनी सांगितले. करार संगोपनातील ४५ ते ५० दिवसांचा खर्च प्रति कोंबडीला लागणार ः ७० ते ८० रुपये शेतकऱ्यांना मिळतात ः ६ ते ८ रुपये प्रतिकिलो उचल नसल्याने होणारे तोटा ः प्रतिकिलो ३ ते ४ रुपये

स्वतः उत्पादनाचा खर्च प्रतिकिलोला लागणारा खर्च ः ७० ते ८० रुपये नियमित मिळणार दर ः १२० ते १४० सध्या मिळणारा दर ः २० ते ३० रुपये फटका ः प्रतिकिलो ८० ते १०० रुपय

प्रतिक्रिया कोरोना आणि चिकन याचा कसलाही संबंध येत नसतानाही चुकीच्या अफवेमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. कुक्कुटपालन व्यवसाय पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी मोडून पडेल; पण लोकांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. सरकारनेच याबाबत काही तरी करायला पाहिजे. — ज्ञानेश्वर चोभे, कुक्कुटपालन शेतकरी, बाबुर्डी बेंद, ता. नगर, जि. नगर   पंचेचाळीस दिवसांत कंपनीकडून कोंबड्याची उचल केली जाते. आता मात्र, पासष्ट-सत्तर दिवस झाले तरी उचल नाही. त्यामुळे कोंबड्या संाभाळताना शेतकरी त्रस्त आहेत. राज्यात सर्वाधिक कोंबडी उत्पादन नगरमध्ये होत असताना हा व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे. यातून मोठे   आर्थिक नुकसान होत असून, त्याबाबत सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. — सचिन भोंगळ, सचीव, नगर जिल्हा पोल्ट्री फेडरेशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com