मराठवाड्यातील पोल्ट्री उद्योग कोरोनाच्या अफवेमुळे संकटात

दोन हजार पक्ष्यांपासून सुरू केलेला पोल्ट्री उद्योग जवळपास एक लाख पक्ष्यांपर्यंत पोचविला. त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली; परंतु कोरोनाविषयीच्या अफवेमुळे आमचा उद्योग जवळपास कोलमडून पडला. शासनाने या उद्योगाला वाचविण्यासाठी आर्थिक मदतीचा आधार द्यावा. - भागवत केंद्रे, पोल्ट्रीधारक, कुमठा खु. ता. उदगीर, जि. लातूर.
poultry
poultry

औरंगाबाद : ‘कोरोनो’ व्हायरससंबंधीच्या अफवेचा मोठा फटका मराठवाड्यात पोल्ट्री उद्योगाला बसला आहे. अफवेमुळे मराठवाड्यातील पोल्ट्री उद्योगातील कोट्यवधींची उलाढाल काही लाखांवर आली आहे. कवडीमोल विकल्या जाणाऱ्या पक्ष्यांना पालनासाठी उचलच नसल्याचे जाणकार व पोल्ट्रीधारक सांगतात.   कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात अनेकांनी शेतीला पूरक म्हणून पोल्ट्री उद्योगाकडे धाव घेतली. त्यामुळे जवळपास १८०० ते २००० छोट्या मोठ्या पोल्ट्री फार्मस् मराठवाड्यात उभ्या ठाकल्या. या पोल्ट्रीच्या माध्यामतून जवळपास २५ ते ३० लाख पक्षी दरमहा पालनासाठी जात होते. सरासरी ५०० पक्ष्यांपासून १० हजार पक्ष्यांपर्यंत; तर काही एक लाखाच्या आसपास पक्ष्यांचे पालन करणाऱ्या पोल्ट्रीधारकांचा समावेश आहे.   साधारणत: ४० ते ४५ दिवसांत एक किलोचा पक्षी तयार करण्यासाठी प्रत्येक पक्ष्यामागे पोल्ट्रीधारकाला ७० ते ७५ रुपये खर्च येत होता. या पक्ष्याला बाजारात ८० ते ९० रुपये प्रतिपक्षीप्रमाणे दर मिळत होते. जानेवारीपर्यंत हे सार सुरळीत सुरू होतं; परंतु गत महिनाभरापासून कोरोना व्हायरस मांसाहारातून पसरत असल्याच्या अफवेने मराठवाड्यातील पोल्ट्री उद्योगाला संकटात ढकलण्याचे काम केल्याचे पोल्ट्रीधारक सांगताहेत. या अफवेमुळे सुरुवातीला निम्म्याने व आता अलीकडे १० ते २० रुपये प्रतिकिलो अशा कवडीमोल दराने कुक्‍कुट पक्ष्यांची विक्री करण्याची वेळ पोल्ट्रीधारकावर आल्याने उत्पादन खर्चातच कुक्‍कुटपक्षी पालकांना ७० ते ८० टक्‍के  फटका बसतो आहे. या आर्थिक फटक्‍यामुळे मराठवाड्यातील पोल्ट्रीचे छोटे मोठे अनके उद्योग कोलमडून पडल्याचे चित्र आहे.  महिन्याला जवळपास १६ ते १७ कोटींपर्यंत उलाढाल असलेला पोल्ट्रीचा उद्योग आजघडीला काही लाखांत म्हणण्यापेक्षा जवळपास ठप्पच झाल्याची स्थिती आहे. कुक्‍कुट पक्ष्यांना उचलच नसल्याने या उद्योगाशी प्रत्यक्षरीत्या जोडून असलेल्या १५ ते २० हजार किंबहुना यापेक्षा जास्त लोकांच्या रोजगारावर व चरितार्थावरही संक्रांत आल्याचे जाणकार सांगतात.   हवा शासनाचा आधार बर्डफ्ल्यूच्या संकटावेळी पोल्ट्री उद्योगाला वाचविण्यासाठी शासनाने प्रतिपक्षी काही रक्‍कम देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला. केवळ अफवेमुळे ८० ते ९० टक्‍के नुकसान सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला उभे करण्यासाठी आर्थिक मदत, कर्ज; तसेच खाद्य उपलब्ध करून देण्याची मागणी पोल्ट्रीधारकांकडून केली जात आहे. त्याविषयी तालुका, जिल्हा पातळीवर निवेदनाचे सत्र सुरू झाले आहे.  प्रतिक्रिया केवळ अफवांच्या बाजाराने आमच्या पोट्री उद्योगावर संकट कोसळलय. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने किमान मदतीचा हात देणे आवश्‍यक आहे. जवळपास ठप्प पडलेल्या या उद्यागोवर हजारोंचा चरितार्थ अवलंबून आहे याचा शासनाने विचार करावा. - परमानंद साळुंके, पोल्ट्रीधारक व डीलर, सकनेवाडी, जि. उस्मानाबाद. 

पोल्ट्रीधारकांचे होणारे व झालेले नुकसान असह्य आहे. शासनाने प्रतिकिलो प्रतिपक्षी २५ ते ३० रुपये आर्थिक मदत द्यावी. सोबतच किमान दराने खाद्याचा पुरवठा करण्याची सोय करावी.  - संजय नळगिरकर, संचालक, खडकेश्वर हॅचरीज प्रा. लि. औरंगाबाद. 

५०० पक्ष्यांपासून सुरू केलेली पोल्ट्री २५ हजारांपर्यंत नेऊन पोचविली. काही दिवसांपूर्वी जवळपास ८ हजार पक्षी २० रुपये किलोने विकावे लागले. आता पुन्हा दर घसरले. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. शासनाने आधार देण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय उद्योग पुन्हा उभा राहणे नाही.  - शिवाजीराव क्षीरसागर, पोल्ट्रीधारक, पांगरा, जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com