दूध, कांद्याप्रमाणे अंड्यांनाही अनुदान देण्याची मागणी

पशुसंवर्धन सचिव अनुपकुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक झाली. आयुक्‍तदेखील या वेळी उपस्थित होते. बैठकीत पोल्ट्री व्यावसायिकांनी १२ मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रशासनदेखील सकारात्मक आहे. - रवींद्र मेटकर, संचालक, मातोश्री पोल्ट्री, अंजनगावबारी, जि. अमरावती
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर   ः दूध आणि कांद्याप्रमाणे अंड्यालादेखील अनुदान मिळावे, यांसह विविध मागण्यांची पूर्तता राज्य शासनाने करावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होतील, असे आश्‍वासन या वेळी देण्यात आले. 

पशुसंवर्धन विभाचे मुख्य सचिव अनुपकुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २४) मुंबईत बैठक झाली. बैठकीला राज्यभरातील ५१ पोल्ट्री व्यावसायिकांना निमंत्रित करण्यात आले होते.  

राज्यात मका लागवड क्षेत्र आधीच कमी आहे. जे थोडेफार क्षेत्र आहे त्यावरदेखील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे राज्यात मक्‍याचा तुटवडा निर्माण झाला असून, लगतच्या मध्य प्रदेशातून त्याची आयात केली जात आहे. त्याच कारणामुळे मका दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. या वर्षी मका २५ रुपये किलोप्रमाणे विकला जात असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.

पोल्ट्री व्यावसायिक कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्‍याचा वापर करतात. मक्‍याच्या दरातील तेजीमुळे अंड्याचा प्रति नग उत्पादकता खर्च ४ रुपये ३० पैशांपर्यंत पोचला आहे. सण, उत्सवांमुळे अंड्याची मागणी घटल्याने घाऊक दर ३  रुपयांवर पोचले आहेत. परिणामी उत्पादन खर्चही मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी अनुदानावर पशुखाद्य पुरवठ्याची मागणी केली आहे. त्याकरिता पाठपुरावादेखील केला जात आहे.

राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष श्याम भगत यांनीदेखील प्रशासन स्तरावर पाठपुराव्यात सातत्य ठेवले आहे. पशुसंवर्धन खात्याचे सचिव अनुपकुमार आयुक्‍त मिश्रा यांच्या उपस्थितीत मुंबईत याच विषयावर बैठक झाली. या बैठकीत आपल्या मागण्या पोल्ट्री व्यावसायिकांनी सचिवांसमोर मांडल्या. तेलंगणात तेथील राज्य सरकारकडून हमीभावाने मका खरेदी होते. त्यावर केवळ एक रुपया अतिरिक्‍त आकारत हा मका पोल्ट्री व्यावसायिकांना पुरवला जातो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातदेखील मक्‍याचा पुरवठा पोल्ट्री उद्योगाला व्हावा, अशी मागणी करण्यात आली. 

अशा आहेत मागण्या 

  • सरकी आणि सोया ढेपेवरील ५  टक्‍के जीएसटी रद्द करावा. 
  • पोल्ट्री व्यवसायासाठीचे ३५ टक्‍के अनुदान पूर्ववत करावे.
  • पोल्ट्री व्यावसायिकांवर आकारल्या जाणाऱ्या मनमानी ग्रामपंचायत करावर नियंत्रण आणावे.
  • अंड्याला प्रति नग १ रुपया ३० पैसे अनुदान मिळावे.
  • अंड्याला हमीभाव असावा.
  • पोल्ट्री व्यावसायिकांच्या कर्जाचे पुनर्गठण करावे.
  • पोल्ट्रीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजावर सवलत मिळावी. 
  • मक्‍यावरील आयात शुल्क माफ करावे. 
  • तेलंगणाच्या धर्तीवर सरकारनेच मका खरेदी करावी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com