साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाका

गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात वीजबिल थकीत असणाऱ्या कृषिपंपांच्या जोडण्या खंडित करण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. ५० टक्के वीजबिल भरले तरच वीजजोडण्या पूर्ववत करण्याचा इशाराच शेतकऱ्यांना दिला आहे.
Power outage of agricultural pumps in Satara
Power outage of agricultural pumps in Satara

सातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात वीजबिल थकीत असणाऱ्या कृषिपंपांच्या जोडण्या खंडित करण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. ५० टक्के वीजबिल भरले तरच वीजजोडण्या पूर्ववत करण्याचा इशाराच शेतकऱ्यांना दिला आहे. या प्रकारामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळून नुकसानही होण्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून सुरुवातीला शेती, व्यावसायिक, घरगुती जोडणी, कृषिपंप आदींची वसुली करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी व वसुलीही लवकर होण्यासाठी महावितरण विभागाने योजना सुरू करत हप्त्या-हप्त्यात थकीत रक्कम भरण्यास सवलत दिली होती. या योजनेला ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने महावितरणची काही प्रमाणात थकीत वसुली झाली. मात्र, त्यानंतर उर्वरित थकीत बिले वसूल न झाल्याने महावितरणने वीजजोडणी तोडण्यास सुरुवात केली आहे. 

महावितरणच्या सवलत योजनेत सप्टेंबर २०२० पर्यंतच्या वीजबिलावर ५० टक्के सूट असून, त्यानंतरची रक्कम पूर्ण भरावी लागणार आहे. दरम्यान, अवेळी पडणारा पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीचा सण झाल्यानंतरही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन व ऊसतोडीवरही प्रचंड परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले. या परिस्थितीतून शेतकरी उभारी घेत असताना महावितरणने कृषिपंपांच्या जोडण्‍या खंडित करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. 

दरम्यान, महावितरण कंपनी बहुतांश कृषिपंपांच्या मीटरमधील रीडिंग न घेता अंदाजे बिले शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारत आहे. मीटरमधील रीडिंग व प्रत्यक्षात बिलांवरील रीडिंगमध्ये खूप फरक असल्याचे अनेक बिलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे महावितरण जादा रीडिंग लावून चुकीच्या पद्धतीची वसुली करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

ग्रामसभेने उद्या ठराव करावा महावितरण कंपनी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करत आहे. वीज वापरापेक्षा जादा बिले लावत पुन्हा सवलत जाहीर केल्याचे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महावितरण कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दाद मागणार आहे. यासाठी २६ जानेवारीला ग्रामसभेत महावितरणविरोधात पुरावे गोळा करून त्याविरोधात लढा देण्याचा ठराव संमत करा व पुरावे आम्हाला द्यावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com