कृषिपंपाचा वीजपुरवठा दोन महिन्यांपासून खंडित

लोहारा, जि. उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा मागील दोन महिन्यापासून खंडित आहे.
Power supply to agricultural pumps Break for two months
Power supply to agricultural pumps Break for two months

लोहारा, जि. उस्मानाबाद :  लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा मागील दोन महिन्यापासून खंडित आहे. वीजवितरण कंपनीकडे वीजपुरवठा सुरळीत करण्याची वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२७) सकाळी लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकून रोष व्यक्त केला. 

लोहारा शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर सुमारे आठ हजार लोकसंख्येचे हिप्परगा गाव आहे. कृषिपंपांसाठी वीजपुरवठा करण्यासाठी लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीने स्वतंत्र फिडरची व्यवस्था करून ६८ रोहित्र बसवले आहेत. परंतु या फिडरवरूनच इतर तीन गावांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे फिडरवर अतिरिक्त भार पडतो. परिणामी, सतत रोहित्र नादुरूस्त होणे, तांत्रिक बिघाड, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. 

मागील दोन महिन्यांपासून परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील विंधन विहीर, विहिरी, नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्या भरवशावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, करडई आदी पिके घेतली आहेत. वातावरण पोषक असल्याने शिवार बहरला आहे.

उत्पादनाची आशा असतानाच वीजपुरवठा खंडित आहे. तक्रारीची दखल घेतली नसल्याने हिप्परगा येथील संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बुधवारी सकाळी लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित लोमटे, माजी सरपंच विजय लोमटे, धरमवीर जाधव, नारायण क्षीरसागर, जीवन होनाळकर, विनोद मोरे, संजय नरगाळे, अनिल आतनुरे, उमेश गिराम, मनोज गवळी, तानाजी नरगाळे, ज्ञानेश्वर मोरे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com