डाळिंबाचे स्वतंत्र निर्यातक्षम वाण आवश्‍यक : प्रभाकर चांदणे

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना प्रभाकर चांदणे
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना प्रभाकर चांदणे

सोलापूर  ः डाळिंब उत्पादनात भारत पुढे आहेच. पण एकरी उत्पादकता अजूनही कमी आहे. जगाच्या स्पर्धेत भारतीय डाळिंब टिकण्यासाठी निर्यातीसाठी स्वतंत्र रोगप्रतिकारक्षम वाणासह आकाराने मोठे डाळिंब आवश्‍यक आहे, त्यावर संशोधनाचे काम व्हायला हवे, अशी अपेक्षा अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी व्यक्त केली.

सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार (ता. २५) आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. चांदणे बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या सदस्या सौ. चंद्रिका चौहाण, पोलिस उपअधीक्षक शीतल वंजारी, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. के. दिनेशबाबू यावेळी उपस्थित होते.

श्री. चांदणे म्हणाले, की डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ चांगले काम करीत आहेत. पण अजूनही शेतकऱ्यांच्या गरजा विचारात घेऊन काम व्हायला हवे. शास्त्रज्ञांची उपलब्धता, निधी यांसारखे विषय आहेत. पण त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. भारतीय डाळिंबाला जगभरात उठाव आहे. त्याचा फायदा घ्यावा. डाळिंबाचा एकच मृग बहर धरावा, डिसेंबर ते मार्च या कालावधीत युरोपियन बाजाराची संधी असते, आपण ती मिळवली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र निर्यातक्षम वाण, डाळिंबाचा आकार, वजन यावरही काम व्हायला हवे.

डॉ. शर्मा म्हणाल्या, की गेल्या पंधरा वर्षांत केंद्राने मोठे काम उभे केले आहे. तेलकट डाग, मरसारख्या रोगांवर शिफारशी सुचवल्या. त्यावर आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता आले आहे. देशभरातील विविध राज्यांत डाळिंबाची लागवड वाढते आहे. प्रक्रियेवरही काम सुरू आहे. काही निष्कर्ष हाती आली आहेत. डाळिंबाच्या ज्यूस, तेलासह विविध औषधोपयोगी तंत्रज्ञान प्रक्रियेत अवलंबले जात आहे. सोलापूर लाल, सोलापूर अनारदाणा ही वाणे संशोधन केंद्राने विकसित केली आहेत. शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर ती दिली आहेत. त्याचेही निष्कर्ष चांगले आहेत.  डॉ. दिनेश बाबू, डॉ. नीलेश गायकवाड, डॉ. एन. व्ही. सिंग, डॉ. अशिष मायेती, डॉ. डी. टी. मेश्राम, डॉ. यू. आर. सांगळे, डॉ. पी. जी. पाटील, डॉ. मल्लिकार्जून यांनी तांत्रिक सत्रात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. व्ही. सिंग यांनी केले. 

‘प्रात्यक्षिक प्लॉटसाठी एकरी लाख रुपये देऊ’ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात बाहेरील शेतकरी भेट द्यायला, माहिती घ्यायला येतात. या ठिकाणी प्रात्यक्षिक प्लॉट तयार केले पाहिजेत, त्यात डाळिंबाची लागवड, कीड- रोग नियंत्रण, डाळिंबाची गुणवत्ता, आकार यावर काय काम केले, कोणत्या पद्धतीने ते कसे केले यावर प्रत्यक्ष अनुभवाधारित माहिती घेता येऊ शकेल, अशी सूचना श्री. चांदणे यांनी मांडली. तसेच यासाठी सांगोल्याच्या कृषी विकास केंद्राकडून एकरी एक लाख रुपयांचा निधीही देऊ, असे आश्‍वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com