पदव्युत्तर सीईटीपासून ‘सरावा’चे विद्यार्थी वंचित

CET
CET

पुणे : कृषी पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यभर घेतल्या जात असलेल्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी (सीईटी) यंदा कृषी पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले. ‘मान्यता नसताही चुकीची माहिती देत अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाच आम्ही रोखले. पात्र परीक्षार्थी मात्र शांततेत परीक्षेला सामोरे जात आहेत,’ अशी भूमिका परीक्षा मंडळाने घेतली आहे. कृषी विद्यापीठांमधील विविध विद्याशाखांमध्ये २०१६-१७ च्या तुकडीचे तसेच २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच पदव्युत्तर सीईटीसाठी पात्र होते. तथापि, राज्यातून २०१७-१८ व २०१८-१९ च्या तुकडीमधील विद्यार्थ्यांनीही सीईटीसाठी अर्ज भरले होते. या विद्यार्थ्यांना सरावासाठी परीक्षा द्यायची होती. अशा पद्धतीच्या वैयक्तिक सराव परीक्षा यापूर्वीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या होत्या. यंदा मात्र, महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाने या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले. मंडळाच्या म्हणण्यानुसार, ‘पदव्युत्तर सीईटीसाठी कृषीच्या विद्याशाखांमधील शेवटच्या वर्षाचे किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. मात्र हजारो विद्यार्थी अकारण परीक्षेला बसतात. त्यामुळे परीक्षा यंत्रणेवर ताण येतो. यंदा असा ताण सहन करण्याची क्षमता मंडळाची तसेच विद्यापीठांची नव्हती. त्यामुळे नियमानुसार आम्ही अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले. त्यामुळे गेल्या वर्षी २३ हजार ५०० परीक्षार्थी होते. यंदा ही संख्या पाच हजार इतकी खाली आली आहे.’ राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सीईटी शांततेत सुरू आहे. पदव्युत्तरच्या अवघ्या १४५० जागांसाठी यंदा १४ परीक्षा केंद्रांवर यंदा १८ हजार ५०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मंडळाने मनाई करून देखील काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने गोंधळाची स्थिती तयार झाली. अर्थात त्यामुळे ‘मान्यता नसतानाही खोटी माहिती देऊन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करण्याचा हक्क नाही’, अशी भूमिका घेत परीक्षा यंत्रणेने या नाराजीकडे दुर्लक्ष केले आहे. ‘अनावश्यकपणे सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत आमच्याकडे काहीही पर्याय नव्हता. त्यांची ओळख आम्हाला पटवता आलेली नाही. अर्थात, असे विद्यार्थी पुढील वर्षी पुन्हा अर्ज भरतील व त्या वेळी मात्र संगणकीय प्रणाली या विद्यार्थ्यांची नावे शोधून काढू शकेल. आमचा विद्यार्थ्यांना विरोध नाही. तथापि, साधनसामग्री नसल्याने अनावश्यक परीक्षार्थी आम्ही सामावून घेऊ शकलो नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना रोखण्याचा निर्णय अधिष्ठाता समितीने घेतला होता,’ असे मंडळाने स्पष्ट केले. कृषी विद्यापीठांच्या या निर्णयावर मात्र विद्यार्थी नाराज आहेत. ‘मागील अनेक वर्षांपासून कृषी महाविद्यालयांमधील तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी सीर्ईटी देत होते. मुळात, राज्यातून कृषी पदवीचे १५ हजार विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. मात्र कृषी विद्यापीठे दीड हजार विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर शिक्षण देत नाही. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी सीईटी मुद्दाम देतात. यातून त्यांना त्यांच्यातील क्षमता कळते व सरावदेखील करता येतो,’ अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे. राज्यातील अनेक खासगी महाविद्यालयातील विद्यार्थी हे दिल्लीची सीईटी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी परराज्यांत होते. परंतु मागील वर्षीपासून ‘अ’ दर्जा नसलेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याची भूमिका आयसीएआरने घेतली आहे, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गुणवत्ता यादीत असूनही ‘पदव्युत्तर’चे दरवाजे बंद राज्यातील एकाही खासगी कृषी महाविद्यालयाने आयसीएआरच्या मानकानुसार दर्जा प्राप्त केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये येऊन सुद्धा दिल्ली किंवा अशा संलग्न कृषी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तरसाठी प्रवेश मिळत नाहीत, अशी खंत विद्यार्थी मांडतात. उदाहरणार्थ, राज्यातील वरोरा कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी अनेक वर्षांपासून दिल्लीतील सीईटीच्या गुणवत्ता यादीमध्ये येऊन आयसीएआर कोट्यामध्ये प्रवेश मिळवत होते. परंतु मागील वर्षीपासून त्यांना गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा प्रवेश मिळाला नाही. परिणामी, राज्यातील खासगी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीत पदव्युत्तर शिक्षणाचे दरवाजे बंद झालेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com