प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना भारतरत्न

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना भारतरत्न
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना भारतरत्न

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, रचनात्मक ग्रामविकासाच्या कार्यात भरीव योगदान देणारे विख्यात समाजिक कार्यकर्ते व चित्रकूटचे कर्मयोगी नानाजी देशमुख तसेच प्रख्यात संगीतकार गायक भूपेन हजारिका यांना शुक्रवारी (ता.२५) ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. 

नानाजी व हजारिका यांना मरणोत्तर हा सन्मान देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीनही जणांना भारतरत्न मिळाल्याबद्दल ‘ट्विट’ करून आनंद व्यक्त केला. भारतीय राजकारणातील ‘स्टेट्‌समन’ अशी ओळख असलेले प्रणव मुखर्जी यांची भारतरत्नसाठीची निवड हा सर्वांत चर्चेचा विषय ठरला आहे. प्रणवदा नावाने परिचित असलेल्या मुखर्जी यांनी आपल्या सहा दशकांहून जास्त काळाच्या राजकीय प्रवासात काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांची भक्कम पाठराखण केली. इंदिरा गांधी यांचा आपल्या मंत्रिमंडळातील ज्या तरुणतुर्क नेत्यांवर सर्वाधिक विश्‍वास होता त्यात प्रणव मुखर्जी यांचे नाव अग्रक्रमावर होते. 

केंद्रीय राजकारणात त्यांना राज्यसभा अधिक प्रिय राहिली असली तरी त्यांनी अर्थ, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, वाणिज्य अशी महत्त्वाची सर्व मंत्रालये समर्थपणे हाताळली. राजीव गांधी यांच्या काळात काही काळ त्यांनी आपला दुसरा पक्ष स्थापन केला होता. मात्र लवकरच ते स्वगृही परतले व यूपीए-१ व यूपीए-२ सरकारांमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर असताना देशाचे अर्थमंत्री असलेल्या प्रणवदांचे व डॉ. सिंग यांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे असल्याचे दिसले. प्रणवदांनी २०१२ चा अर्थसंकल्प सादर करेपर्यंत  काँग्रेसच्याच विचारांचे अधिष्ठान त्यांनी अभिमानाने मिरविले. २०१२ मध्ये प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर त्यांची भारताच्या राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपतिपदी असतानाही त्यांनी स्पष्टपणे विचार मांडण्यास मागेपुढे पाहिले नाही. अलीकडेच त्यांनी नागपूरला संघ मुख्यालयातील कार्यक्रमाला लावलेली हजेरी हा चर्चेचा विषय ठरला होता. स्पष्टवक्ते असलेले प्रणवदा हवापाण्याच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी कधीच उपलब्ध नसत व नाहीत. 

आधुनिक दधिची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांच्या एका भेटीने संघकार्याकडे ओढले गेलेले नानाजी हे आधुनिक काळातील दधिची म्हणून ओळखले जातात. संघाच्या कठीण काळातही अतिशय कट्टरपणे संघकार्याच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका पार पाडली. विशेषतः उत्तर प्रदेशात बलरामपूरमधून निवडून आल्यावर केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर त्यांनी धुडकावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील नेतृत्वगुणांची पारख सर्वप्रथम होणाऱ्या नेत्यांमध्ये नानाजीही होते. उत्तर प्रदेशात जनसंघाचे जाळे विस्तारण्यात नानाजींनी भरीव योगदान दिले. सक्रिय राजकारणात असतानाच नानाजींनी राजकारण सन्यास घेतला व दीनदयाळ शोध संस्थेच्या माध्यमातून सर्वांगीण ग्रामविकासाच्या कामाला गोंडा (उत्तर प्रदेश) येथून सुरवात केली. तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी त्या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले होते. तेव्हापासूनच रचनात्मक ग्रामविकासाच्या कामाला नानाजींनी आपले तन मन धन अर्पण केले. गोंडा पाठोपाठ नानाजींनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील सोनदरा येथे तलावांतील गाळ काढून त्यांची सफाई करणे, नागपूरमधील वंचित मुलांसाठीचा बालजगत प्रकल्प, बिहारमधील सिंगभूम व अखेरीस मध्य प्रदेशातील चित्रकूट या भागात नानाजींनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटविला. विशेषतः चित्रकूट व परिसरातील ५०० गावे दत्तक घेऊन नानाजींनी ग्रामविकासाचे काम सुरू केले त्याची साऱ्या जगात प्रशंसा झाली. चित्रकूटचे ग्रामीण विद्यापीठ हे हजारो ग्रामस्थांसाठी प्रेरणाकेंद्र ठरले. २७ फेब्रुवारी २०१० रोजी नानाजींनी चित्रकूट येथेच अखेरचा श्‍वास घेतला. मात्र आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयवाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी त्यांनी देहदान केले.

मातीशी नाळ असलेला संगीतकार संगीतकार भूपेन हजारिका यांनी आसामच्या मातीतील संगीत देशभरात लोकप्रिय केले. ‘दिल हूम हूम करे’ सारख्या गीतांना त्यांनी दिलेला स्वरसाज जाणकारांना भावला. आसामी, बंगाली व हिंदी सिनेसंगीत क्षेत्रातही हजारिका यांनी मुशाफिरी केली. गांधी अँड हिटलर चित्रपटात त्यांनी गायलेले वैष्णव जन तो हे भजन जगभरातील रसिकांची दाद मिळविणारे ठरले. ८ सप्टेंबर १९२६ मध्ये पूर्व हिंदुस्तानात जन्मलेले हजारिका यांनी वयाच्या दहाव्या वर्षी गायिलेले पहिलेच गाणे प्रसिद्धी पावले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com