भावांनो, शेती विकायची नसते; राखायची असते ः प्रवीण तरडे

प्रविण तरडे
प्रविण तरडे

सांगली: ‘मुळशी पॅटर्न’ हा केवळ सिनेमा नाही, ते दाहक वास्तव आहे. माझ्या वडिलांनी मला सतत एक वाक्‍य सांगितलेलं, जे मनाला आणि थेट वास्तवाला भिडलेलं त्रिवार सत्य होतं. ते म्हणजे, ‘भावांनो, शेती विकायची नसते; राखायची असते.’ शेतकरी शेतीचा मालक नसून रखवालदार आहे. एका पिढीकरून दुसऱ्या पिढीकडे वारशाने ही रखवालदारी येत असते. मातीशी नाते कधीच विकता कामा नये, असे आवाहन सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. आपल्या मुळशी पॅटर्न या बहुर्चित चित्रपटाची ऊर्जा मांडताना त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या मानसिकतेवर कठोर भाष्य केले. ‘सकाळ’च्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३५ व्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरमध्ये हा ऊर्जामय सोहळा रंगला. या वेळी महापौर संगीता खोत, ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, कोल्हापूर ‘सकाळ’चे निवासी संपादक श्रीरंग गायकवाड, सहयोगी संपादक शेखर जोशी व्यासपीठावर होते. श्री. तरडे म्हणाले, की मी मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा. हा तालुका वारकरी. मात्र अलीकडे त्याची ओळख गुन्हेगारीचा तालुका अशी झाली. हे का झाले? हा तालुका पैलवानांचा. मामा मोहोळांनी या तालुक्‍यात कुस्तीगीर परिषद स्थापन केली. अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी या मातीतून घडले. त्याच पोलिसांशी या तालुक्‍यातील तरुणांचा संघर्ष माझ्या चित्रपटातून मांडला आहे. ‘‘मी चित्रपटसृष्टीत जम बसवत होतो, तेव्हा माझे वडील भेटायचे, मुळशीच्या एकूण परिस्थितीबद्दल अस्वस्थपणे बोलायचे. त्यांना मुळशीची ओळख गुन्हेगारांचा तालुका अशी होत असल्याचे सहन व्हायचे नाही. हे असे व्हायला नको होते, असे ते हताशपणे बोलायचे. शेती विकायची नसते, राखायची असते. विकलास तर तुझ्या मानगुटीवर भूत होऊन बसेन, असे ते बजावायचे. शेतीतल्या अनेक आठवणीत ते आजही कायम असतात. वडिलांनी एक चौरस फूटही जागा विकली नाही. शेतीशी शेतकऱ्यांनी आपलं इनाम कायम ठेवलं पाहिजे. औद्योगिकरणाच्या रेट्यात ते  गरजेचं आहे,’’ असेही ते म्हणाले. ऊर्जेची परिभाषा एका उदाहरणाने त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘ऊर्जा दोन प्रकारची असते. एक तर दुधात मिठाचा खडा बनून ती दूध नासवते किंवा दुधात केसर बनून दुधाची गोडी वाढवते. माती एकच असते. त्यातून काय उपजते हे महत्त्वाचे.’’ 

मी संघाचा; पण...  आपली वैचारिक पार्श्‍वभूमी स्पष्ट करताना श्री. तरडे म्हणाले, ‘‘मी संघाचा स्वयंसेवक. मी सेवादलातही काम केलंय; पण मला गांधी कळले ते संघाच्या शाखेतच. संघ जगभर पसरलाय, पण संघाची ऊर्जा एक तासाचीच. सकाळी भरते त्या शाखेची. बाकी सगळं थोतांड. संघ त्याचं अवडंबर माजवू लागला तर संघ संपेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.’’ सांगलीशी नाते सांगलीशी आपलं नातं सांगताना श्री. तरडे म्हणाले, ‘‘मी पतंगराव कदमांच्या भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकलो. माझी परिस्थिती चांगली नव्हती. मात्र पतंगरावांनी मला एमबीए होईपर्यंत खूप मदत केली. इथले प्राचार्य डी. जी. कणसे माझे शिक्षक होते. त्या कॉलेजने खूप मदत केली. या शहराशी माझा नाट्यक्षेत्रामुळे सतत संपर्क आला. भावेच्या रंगमंचावर मी जेव्हा येतो तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात. या भूमीत पहिले सीता स्वयंवर नाटक झाले. माझ्या दृष्टीने हे सर्वांत चांगले नाट्यगृह आहे.’’ ‘ऊर्जा’दायी सत्कारमूर्ती  ‘सकाळ’च्या ‘ऊर्जा’ विशेषांकाचं व सत्कारमूर्तींमधील ऊर्जेविषयी श्री. तरडे भरभरून बोलले. ते म्हणाले, ‘‘ही सारी माणसं ऊर्जेचे केंद्र आहेत. ऊर्जेचा लसावि म्हणजे ही सारी माणसं. त्यांच्यातील ही ऊर्जा सांगलीला पुढे नेणारी आहे. ‘सकाळ’ने त्यांचे काम केलेय. आता जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. त्यांना संधी दिली पाहिजे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com