फळे व पालेभाज्यांचे प्रीकूलिंग, पॅकिंग तंत्र

pack house and pre- cooling chamber
pack house and pre- cooling chamber

फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची विक्री होणे आवश्‍यक आहे. हंगामामध्ये बाजारपेठेत एकाच वेळी अधिक आवक झाल्यामुळे दर घसरतात. शेतकऱ्यांना कमी दरामध्ये विक्री करावी लागते किंवा त्यांची नुकसान होते. अशा नाशवंत फळे आणि पालेभाज्यांवर प्रक्रिया करून त्यांचा साठवण कालावधी वाढवणे शक्य आहे. त्याची स्थानिक बाजारात विक्री किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात करणे शक्य होते. फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया उद्योग करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी

  • फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया उद्योगाची जागा महत्त्वाची भूमिका बजावते. कारण त्यासाठी आवश्यक कच्चा माल हा उद्योगाच्या परिसरातून उपलब्ध होतो. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाची जागा योग्य असणे आवश्‍यक आहे. उद्योग स्थानापासून सुमारे ७५ कि.मी. पट्ट्यातील होणाऱ्या पिकांची लागवड, काढणीचा हंगाम यांची मागील किमान ३ वर्षांपर्यंतची सखोल माहिती करून घ्यावी. याला इंग्रजीमध्ये ‘कॅचमेंट एरिया स्टडी’ असे म्हणतात.  
  • या माहितीवरून उद्योजकाला ऋतुमानानुसार किती कच्चा माल उपलब्ध होऊ शकेल? याचा अंदाज येतो. ऋतुमानानुसार, प्रक्रिया करता येणारी उत्पादने व त्यासाठी योग्य प्रक्रिया तंत्राची निवड करता येते. आपल्या प्रक्रिया उद्योगाची शेतीमाल हाताळणी आणि एकूण क्षमता ठरवता येते.  
  • एकूण आवश्यक क्षमतेचा अंदाज आल्यानंतर त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, कच्चा माल खरेदी करण्यासाठी किंवा साठवण्यासाठी खेळते भांडवलाचा अंदाज घ्यावा लागतो. भांडवलाच्या उभारणीचे नियोजन करता येते.  
  • तयार होणाऱ्या उत्पादनाच्या विक्रीसाठी उद्योगापासून नजीकची बाजारपेठ, दूरच्या किंवा परदेशी बाजारपेठ यांची माहिती घ्यावी. वाहतुकीसह निर्यातीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन केले पाहिजे. नियोजन करताना कच्चा माल, विक्रीयोग्य उत्पादन यांच्या बाजारपेठेतील एकूण उलाढालीचे सर्वेक्षण करावे. पूर्ण सर्वेक्षण शक्य नसल्यास काही अस्ताव्यस्त नमुने घेऊन केलेले सर्वेक्षण आणि विश्लेषण पुढील निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
  • प्रक्रिया उद्योगाची कार्यपद्धती

  • फळे व भाज्या काढणीनंतर हा कच्चा माल निवडल्यानंतर वातानुकूलित वाहनातून प्रक्रिया केंद्रात आणला जातो. बाजारातील मागणीप्रमाणे मालाची प्रतवारी व वर्गवारी केली जाते.
  • हा शेतीमाल प्रीकूलिंग चेंबरमध्ये १ अंश सेल्सिअस तापमानात ठेवला जातो. या प्रक्रियेस साधारणपणे ४ ते ६ तासांचा वेळ लागतो. प्रीकूलिंग तंत्र द्राक्ष, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, सफरचंज, मोसंबी, संत्री, लिंबू, अंजीर, पपई, पेरू, डाळिंब यांसारख्या फळांना आणि बेबी कॉर्न, श्रावणी घेवडा, घेडवडा, शेवगा, कारले पडवळ, ढेमसे, गवार, चवळी, दोडका, तोंडली, फ्लॉवर, कोबी, गाजर, भोपळा, ढोबळी मिरची, भेंडी, फरसबी, काकडी, लिंबू, मिरची, अळिंबी, वांगी अशा अनेक भाज्यांसाठीही वापरले जाते.
  • कच्चा माल पाण्यातून धुवून घेते वेळी पाण्याचे तापमान किमान ५ अंश सेल्सिअस ठेवले जाते. निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन (सोडिअम हायपोक्लोराईड) ५० ते १०० पीपीएम च्या द्रावण वापरले जाते.
  • प्रीकूलिंग प्रक्रियेनंतर बाजारपेठेसाठी आवश्यक गुणवत्ता लक्षात घेऊन प्रतवारी किंवा वर्गवारी केली जाते. हा माल पॅक हाउसमध्ये २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ६५ ते ७५ टक्के सापेक्ष आर्द्रता अशा नियंत्रित वातावरणामध्ये ही प्रक्रिया केली जाते.
  • यानंतर ताज्या स्वरुपातील विक्रीसाठी मागणीनुसार आवश्यक तितका शेतीमाल पाठवला जातो. तयार माल आवश्यकतेनुसार योग्य आकारात पॅक करून शीतगृहामध्ये (तापमान १ अंश सेल्सिअस व सापेक्ष आर्द्रता ९८ टक्के) साठविला जातो. यासाठी वातावरण नियंत्रित शीतगृहाची आवश्यकता असते.
  • उर्वरित शेतीमाल अधिक काळ साठवण्यासाठी वाळवणे आवश्यक असते. त्यातील पाणी उष्ण हवेच्या प्रवाहाद्वारे काढून घेतले जाते.
  • प्रीकूलिंग आणि पॅकिंग हाऊस प्रक्रिया  कच्चा माल (वातानुकूलित वाहनातून वाहतूक) । प्रीकूलिंग चेम्बर (उत्पादनाचे तापमान १ अंश सेल्सिअस येईपर्यंत) । प्रतवारी व वर्गवारी (पॅक हाउसचे तापमान २३ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के) । पाण्याद्वारे धुणे (पाण्याचे तापमान साधारण ५ अंश सेल्सिअस व पाण्यात ५० ते १०० पीपीएम क्लोरीन मिसळणे) । वाळविणे । गरजेनुसार योग्य आकारात पॅक करणे । शीतगृह साठवण (शीतगृहातील तापमान १ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ९८ टक्के) । बाजारपेठेतील मागणीनुसार, वातानुकूलित वाहनातून पाठविणे (वाहनातील तापमान १ अंश सेल्सिअस)  

    संपर्क -राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७ (लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांवरील तज्ञ आहे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com