राज्यावर पूर्वमोसमी पावसाची छाया कायम

राज्यात वळिवाचा अंदाज
राज्यात वळिवाचा अंदाज

पुणे : उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाचा राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे ढग जमा होत आहेत. आज (ता. ३) राज्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी होऊन, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. रविवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा, अकोला, अमरावती वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या खाली उतरले आहे.  उन्हाच्या चटक्यात वाढ झाल्याने शनिवारी सकाळपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्ण लाट होती. मात्र रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये तापमानात घट झाल्याचे दिसून आले. 

विदर्भ, मराठवाड्यात गेले काही दिवस ४५ ते ४६ अंशांपर्यंत वाढलेले तापमान कमी झाल्याचे दिसून आले. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंश, मध्य महाराष्ट्रात ३१ ते ४४ अंश, विदर्भ आणि मराठवाड्यात ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान होते.  पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने शनिवारी सांयकाळी नागपूर, गडचिरोलीसह विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली. तर रविवारी दुपारपासूनच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढग जमा झाले होते. आज (ता. ३) विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी (ता. २) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.९ (२.६), जळगाव ४३.० (१.४), कोल्हापूर ३६.२(२.७), महाबळेश्वर ३१.८ (४.८), मालेगाव ४३.६ (४.८), नाशिक ३७.३ (०.८), सांगली ३८.३ (३.८), सातारा ३८.५ (४.४), सोलापूर ४१.०(२.४), अलिबाग ३५.९ (३.१), डहाणू ३५.९ (१.९), सांताक्रूझ ३५.१ (१.७), रत्नागिरी ३४.७ (२.३), औरंगाबाद ४०.७ (२.६), परभणी ४३.६ (३.१), नांदेड ४२.५ (१.९), अकोला ४४.२ (३.१), अमरावती ४४.८ (३.९), बुलडाणा ४२.२ (४.८), बह्मपुरी ४१.९ (०.१), चंद्रपूर ४२.६ (०.१), गोंदिया ४०.४ (-१.८), नागपूर ४३.८ (१.८), वाशीम ४३.०, वर्धा ४५.५ (३.९), यवतमाळ ४२.५(१.७).  आज मॉन्सूनची चाल शक्य नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ३०) संपूर्ण अंदमान बेटांचा परिसर व्यापला. तर अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागातही मॉन्सून दाखल झाला आहे. आज (ता. ३) मॉन्सूनची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती होणे शक्य आहे. तर बुधवारी (ता. ५) दक्षिण भारतात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर मॉन्सूनच्या केरळातील आगमनासाठी पोषक हवामान होईल. यंदा मॉन्सून ६ जून रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com