मराठवाड्यातील दीडशे मंडळात मॉन्सूनपूर्व पाऊस

मराठवाड्यातील दीडशे मंडळात मॉन्सूनपूर्व पाऊस
मराठवाड्यातील दीडशे मंडळात मॉन्सूनपूर्व पाऊस

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळापैकी सुमारे दीडशे मंडळात शनिवारी (ता. ८) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील मंडळात पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील माजलगाव, हिंगोली जिल्ह्यांतील नादापूर मंडळात ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी वादळासह आलेल्या पावसामुळे टिनपत्र उडून जाणे, विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली.  

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सोयगाव, वैजापूर तालुक्‍यांतील ९ मंडळात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पैठण तालुक्‍यातील बालानगर मंडळात सर्वाधिक १७ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. जालन्यातील २६ मंडळात पाऊस बरसला. मंठा तालुक्‍यातील चार, घनसावंगीतील ७, परतूरमधील ५, जाफ्राबादमधील ४ व जालना तालुक्‍यातील ६ मंडळात पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस ढोकसाल मंडळात झाला. त्यापाठोपाठ मंठा मंडळात २८, सेवलीत २७, रांजणीत २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

परभणी जिल्ह्यातील १७ मंडळात पाऊस झाला. जिल्ह्यातील जिंतूर तालुक्‍यात काही ठिकाणी वादळासह पाऊस झाला. त्यामुळे झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोलमडून पडले. मानवत तालुक्‍यातील कोल्हा मंडळात सर्वाधिक ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ मानवत मंडळात २२ मिलिमीटर, चिकलठाण्यात २५ मिलिमीटर पाऊस झाला. 

हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २० मंडळात पाऊस झाला. कळमनुरी तालुक्‍यातील नादापूर मंडळात सर्वाधिक ५५ मिलिमीटर, हिंगोली मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील माहूर, हदगाव, मुखेड, नायगाव, किनवट आदी तालुक्‍यांतील १३ मंडळात पाऊस झाला. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २९ मंडळात पाऊस झाला. माजलगाव तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. माजलगाव मंडळात ५२, कि. आडगाव ३०, गंगामसला ३०, तालखेड २६, कौडगाव बु. २६, पिंपळनेर २१, कौडगाव बु. मंडळात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी २१ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. उदगीर तालुक्‍यातील देवर्जन मंडळात सर्वाधिक १४ मिलिमीटर पाऊस झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी १५ मंडळात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. लोहारा तालुक्‍यातील लोहारा, माकणी व जेवळी मंडळात १२ ते २३ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. तुळजापूर तालुक्‍यातील सावरगाव मंडळात १९ मिलिमीटर, तर उमरगा तालुक्‍यातील नारगवाडी मंडळात १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

वीज पडून दोन जखमी; झाडे कोसळली जिंतूर शहरासह तालुक्‍यात शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी पाचच्या सुमारास विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह २०-२५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील झाड जवळच्या रोहित्रावर उन्मळून पडले. गडदगव्हाण  (ता. जिंतूर) येथे वीज पडून दोघे जखमी झाले. वादळी वाऱ्यामुळे शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील मोठे झाड शेजारच्या रोहित्रावर कोसळले. त्यात रोहित्र जमीनदोस्त झाले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्‍यातील वरूड (नृसिंह), निवळी, बलसा, पुंगळा, लिंबाळा, मानमोडी व परिसरातील काही गावांत वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी बागायती पिकांचे नुकसान झाले.

दरम्यान, जिंतूर - जालना मार्गावर काही ठिकाणी झाडे कोसळली. त्यामुळे काही वेळ वाहतुकीला व्यत्यय आला. गडदगव्हाण (ता. जिंतूर) येथे शेतात काम करीत असलेल्या प्रेमदास गोविंद आढे (वय ५०) व बिजूबाई सुभाष आढे (वय ३५) हे विसाव्यासाठी झाडाखाली थांबले असता, त्या झाडावर वीज पडली. यात दोघेही भाजून गंभीर जखमी झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com